सूरत : पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे थांबवले पाहिजे, अन्यथा पाकिस्तानचे तुकडे होणे अटळ आहे, असे खडे बोल भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले आहेत. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या 122 सैनिकांच्या कुटुंबियांच्या सन्मान कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते.


पाकिस्तानी घुसखोरांनी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जवान त्यांना पुन्हा मागे फिरायची संधी देणार नाहीत, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यामुळे विविध पद्धतीने पाकिस्तान भारतविरोधी भूमिका घेत आहे.


भारताची प्रगती पाकिस्तानला पचवणे अवघड जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावत आहे, हे पाकिस्तानला सहन होत नाही. त्यामुळे पाकिस्तान जम्मू-काश्मीरचा मुद्दा वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पाकिस्तानला कुणाचंही समर्थन मिळत नाही. मानवाधिकाराचं उल्लंघन कुठे होत आहे तर ते पाकिस्तानात होत आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.


स्वातंत्र्यानंतर भारतात अल्पसंख्याकांची लोकसंख्या वाढली, मात्र पाकिस्तानात शिख, बौद्ध आणि इतर धर्मातील नागरिकांच्या मानवाधिकाराचं हनन होण्याचे प्रकार वाढत आहे. भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत आणि ते भविष्यातही राहतील, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं. भारतात लोकांना धर्म आणि जातीच्या आधारावर वेगळं केलं जात नाही. धर्म आणि राजकारण करत इंग्रजांनी भारताचे दोन तुकडे केले. मात्र 1971 मध्ये पाकिस्तानचे धर्माच्या आधारावर दोन तुकडे झाले. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढेही पाकिस्तानेच तुकडे होणे, कुणीही टाळू शकणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.