नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, यांच्यासह राज्यातल्या तसेत केंद्रातल्या अनेक दिग्गजांची हजेरी होती.


पक्षप्रवेशानंतर उदयनराजे म्हणाले की, लोकांच्या हितासाठी मी हा भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे निस्वार्थी भावनेने मी हे पाऊल उचलले आहे. मोदी-शाह देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहेत, त्याचबरोबर त्यांनी लोकशाही मजबूत केली आहे. कलम 370 रद्द करण्याचा निर्णयदेखील याच सरकारने घेतला. त्यामुळे मी भारावून गेलो आहे.

गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या विचारातून भाजपचं कार्य सुरु आहे. त्यांच्या प्रेरणेतून काम सुरुच राहील. त्यामुळे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा युतीचं सरकार येईल. आम्हाला बहुमतही मिळेल.

'मला संपर्क करू नका, मी जातोय'

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उदयनराजेंच्या भाजपमध्ये येण्यामुळे पक्षाला मोठा फायदा होणार आहे. उदयनराजे यांनी काल (13 सप्टेंबर) रात्री खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता नव्याने निवडणूक लढून रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येतील आणि पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेत जातील.