जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून काल (बुधवार) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं. यावेळी काश्मीरमधल्या सांबा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात असणारा एक सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला.


राधापद हाजरा असं या जवानाचं नाव असून दुर्देवानं कालच त्यांचा वाढदिवस होता. सांबा सेक्टरमधील सीमरेषेजवळ ते तैनात होते. यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयातही नेण्यात आलं. पण तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

शहीद जवान आर पी हाजरा हे प. बंगालमधील मुर्शिदाबादमधील असून कालच त्यांचा वाढदिवसही होता. तब्बल 27 वर्ष ते बीएसएफमध्ये कार्यरत होते. त्यांना एक 21 वर्षाची मुलगी आणि 18 वर्षांचा मुलगा आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारानंतर भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं.

2017 साली पाकिस्ताननं आतापर्यंत सर्वाधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. ज्यामध्ये लष्कराचे 19 बीएसएफचे चार जवान शहीद झाले आहेत. तर 35 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.

23 डिसेंबरला राजौरी येथे पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका मेजरसह तीन जवान शहीद झाले होते. ज्यानंतर भारतीय लष्करानं तीन पाकिस्तानी रेंजर्सला ठार केलं होतं.

संबंधित बातम्या :

पुलवामा हल्ला : 4 जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

भारताकडून पाकच्या हल्ल्याचा बदला, LoC पार करुन तीन सैनिकांचा खात्मा

पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भंडाऱ्यातील मेजरसह चार जवान शहीद