नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी 100 कोटी रुपयांना राज्यसभेची दोन तिकिटं विकल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
‘आप’ पहिल्यांदाच राज्यसभेत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पहिल्यांदाच राज्यसभेत प्रवेश करणार आहे. राज्यसभेसाठी ‘आप’ने आपल्या तीन उमेदावारांची घोषणा केली आहे. यामध्ये संजय सिंह, एन डी गुप्ता आणि सुशील गुप्ता यांच्या नावांचा समावेश आहे.
आधीपासूनच चर्चेत असणाऱ्या कुमार विश्वास आणि आशुतोष यांना मोठा धक्का मानला जातो आहे. या दोघांचं तिकीट ‘आप’ने कापल्याचीही चर्चा आहे.
प्रवेश वर्मांचा गंभीर आरोप
आम आदमी पक्षाने राज्यसभेच्या तिकिटाची 50 कोटींना विक्री केली, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी केला आहे. प्रवेश वर्मा म्हणाले, “सुशील गुप्ता हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मला सांगितलं की, त्यांनी 50 कोटी रुपये देऊन राज्यसभेचं तिकीट खरेदी केलं.”
अरविंद केजरीवाल यांना आव्हान देत प्रवेश वर्मा म्हणाले, “मी केजरीवालांना उघडपणे आव्हान देतो की, त्यांनी स्वत:ची नार्को टेस्ट करावी. जर त्यांनी 100 कोटींना दोन तिकिटांची विक्री केली, हे सांगितलं नाही, तर मी कुटुंबासोबत देश सोडून जाईन.”
केजरीवालांवर अशा प्रकराचा आरोप करणारे प्रवेश वर्मा हे एकमेव नाहीत. याआधीही भाजपच्या गोटातून असे आरोप करण्यात आले आहेत. भाजपचे प्रवक्ता हरीश खुराना यांनी प्रवेश वर्मांच्या पुढे जात आरोप केलाय की, “सुशील गुप्ता यांना राज्यसभेचं तिकीट देण्यासाठी 70 कोटी रुपयांची डील झाली.”
हरीश खुराना म्हणाले, “मी सुशील गुप्ता यांनी जवळून ओळखतो. त्यांच्याच माहितीनुसार, जवळपास 70 कोटी रुपयांमध्ये सुशील गुप्ता यांच्याशी डील झाली आहे. ‘बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया’ असे मी ऐकलंय. मात्र केजरीवालांना हे तंतोतंत लागू होतं.”
“केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांनी तिकीट न देऊन त्यांचा अपमान केला आहे. कुमार विश्वास भाजपमध्ये येतील किंवा नाही, हे भविष्य ठरवेल. मात्र ते राज्यसभेच्या तिकिटासाठी पात्र होते. त्यांच्याबाबत चुकीचं झालं आहे.”
भाजप नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे केजरीवाल स्वत: पुढे येऊन यावर उत्तर देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘आप’ने राज्यसभेची तिकिटं 100 कोटींना विकली : भाजप खासदार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jan 2018 11:18 PM (IST)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पहिल्यांदाच राज्यसभेत प्रवेश करणार आहे. राज्यसभेसाठी ‘आप’ने आपल्या तीन उमेदावारांची घोषणा केली आहे. यामध्ये संजय सिंह, एनडी गुप्ता आणि सुशील गुप्ता यांच्या नावांचा समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -