26/11 Terrorist Attack : पाकिस्तान ( Pakistan ) हे दहशतवादाला ( Terrorist ) खतपाणी घालत आहे, हे सर्वच देशांनी मानलं आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या (Mumbai Terrorist Attack) मुख्य सूत्रधारांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावर भारताने पाकिस्तानला खडेबोल सुनावल्यावर आता पाकिस्तानने त्यावर उत्तर दिलं आहे. पाकिस्तानने म्हटलं आहे की, भारताने 26/11 हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात पुरावे द्यावेत. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या बैठकीत मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानवर निशाणा साधला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लष्कर-ए-तोएबाचा ( Lashkar E Taiba ) प्रमुख हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला. हे दहशतवादी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार होते, मात्रा त्यांना कोणतीही शिक्षा झालेली नाही.


मुंबईत ताज हॉटेलमध्ये शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षेची दहशतवाद विरोधी समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. दहशतवाद्यांवर खटला चालवण्यात आणि त्यांना शिक्षा करण्यात पाकिस्तानला अपयश आल्याची टीका भारताने केली. भारताच्या या टीकेला पाकिस्तानने स्पष्टपणे नकार दिला आहे. 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या लष्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्यांविरोधात ठोस पुरावे सादर करण्यास पाकिस्ताननं सांगितले आहे. 


संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची विशेष बैठकीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व पंधरा सदस्य देशांचे राजदूत उपस्थित होते. दहशतवादविरोधी समितीच्या विशेष बैठकीत भाषण देताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदसह मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांवर अद्याप कारवाई झालेली नाही. उलट पाकिस्तानने त्यांना संरक्षण दिलं असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.


परराष्ट्र मंत्र्यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर टीका


परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना सांगितले की, मुंबई हल्ल्यातील एका दहशतवाद्याला (अजमल कसाब) जिवंत पकडण्यात आले आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. पण 26/11 च्या हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार अजूनही सुरक्षित असून आणि त्यांना कोणतीही शिक्षा झालेली नाही. त्यांनी असंही म्हटले आहे की, जेव्हा काही दहशतवाद्यांवर बंदी घालण्यासाठी पावले उचलली गेली तेव्हा काही प्रकरणांमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) देखील राजकीय कारणांमुळे कोणतीही कारवाई करू शकली नाही.


चीनवर भारताचा जोरदार निशाणा


दहशतवादविरोधी समितीच्या विशेष बैठकीत भाषण करताना परराष्ट्रमंत्र्यांनी चीनवरही चांगलाच निशाणा साधला. परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात UNSC अपयशी ठरल्याचं कारण चीन असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांवर बंदी घालण्याच्या UNSCच्या ठरावांना अनेक वेळा चीनने  अडथळे आणले. याचा संदर्भ देत परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला घेरलं.


26/11 दहशतवादी हल्ला


26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्यांनी मुंबई हादरवली होती. दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी रेल्वे स्टेशन, लिओपोल्ड कॅफे, दोन रुग्णालये आणि एका थिएटरसह दक्षिण मुंबईतील अनेक भागात नागरिकांवर हल्ले केले. मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन हाऊसमध्येही दहशतवाद्यांनी लोकांना कैद केलं होतं. 26/11 च्या हल्ल्यात 174 निष्पापांना आपला जीव गमवावा लागला होता आणि 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे 20 जवानही शहीद झाले होते. याशिवाय 26 परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला होता.