पंजाबच्या अमृतसरमधून काही जणांना नकली नोटांसह अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजारांच्या बनावट दोन हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आला. या नोटा पाकिस्तानमधून भारतात पाठवल्या जात असल्याचा संशय आहे.
नोटाबंदीनंतर दावा केला जात होता की, आता पाकिस्तानमध्ये छापल्या जाणाऱ्या बनावट नोटांचा काळा धंदा बंद होईल. पण केवळ 44 दिवसांतच सीमेपलिकडे दोन हजारांच्या बनावट नोट छापून, त्या भारतात पाठवल्या जात असल्याचं समोर आलं आहे.
अमृतसरमध्ये महताब सिंह आणि निर्मल कौर नावाच्या महिलेकडून पोलिसांनी या बनावट नोटा जप्त केल्या. हे दोघेर ड्रग्ज तस्करीच्या अनेक प्रकरणातील आरोपी आहेत. या नोटांची तस्करी करण्यासाठी स्कूटरवरुन जात असताना पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांकडे बनावट नोटा पाठवण्याचं काम पाकिस्तानने आधीच सुरु केलं असावं, असा संशय पोलिसांना आहे.
दुसरीरडे मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्येही 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ग्वाल्हेरच्या हजीरा परिसरात अभिषेक नावाचा एक व्यक्ती सिगरेटच्या दुकानात 500 ची बनावट नोट खपवत असताना त्याला अटक करण्यात आली. अभिषेकच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक केली. दोघांकडून सुमारे 13 हजारांच्या 500 आणि 100 च्या नोटा जप्त करण्यात आल्या. यात 500 च्या 14 नोटा आहेत तर 100 च्या 54 नोटा आहे.
याआधी गुजरातच्या भूज आणि मध्य प्रदेशच्या शहडोलमध्येही बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.