Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (12 जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान (Air India Plane Crash In Ahmedabad) अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे.
सदर विमान अपघातानंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अहमदाबादमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावर 20 मिनिटं नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. अपघाताची कारणं, झालेलं नुकसान याची माहिती नरेंद्र मोदींनी घेतली. तसेच पाहणी केल्यानंतर नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्याचं पाहायला मिळाले. विमान अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर नरेंद्र मोदी रुग्णालयात देखील गेले. यावेळी अपघातातील जखमींची नरेंद्र मोदींनी विचारपूस केली. रूग्णालयात नरेंद्र मोदी जवळपास 10 मिनिटे उपस्थित होते. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif Post On Ahmedabad Airplane Crash) यांनी अहमदाबादमधील विमान अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे.
गुजरातमध्ये विमान अपघात, शाहबाज शरीफ यांचं ट्विट- (Shehbaz Sharif Post On Ahmedabad Airplane Crash)
विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील 10 जणांचा मृत्यू-
महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे. मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल हे मुंबईत पवई इथले आहेत. क्रू मेंबर अपर्णा महाडिक गोरेगावच्या तर साईनीता चक्रवर्ती जुहूच्या तर रहिवासी आहेत. क्रू मेंबर रोशन सोनघरे या डोंबिवलीकर आहेत. तर दीपक पाठक हे बदलापूरचे आहेत. मैथिली पाटील पनवेलजवळील न्हावा गावच्या आहेत. प्रवाशांपैकी आशा पवार आणि महादेव पवार दाम्पत्य हे पंढरपूरचे रहिवासी आहेत. तर मयूर पाटील या रहिवाशाची अजून माहिती समजलेली नाही. तर यशा कामदार या नागपूरच्या आहेत.