Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातावेळी विमानात प्रवाशी आणि क्रू मेंबर्स मिळून 242 जण होते. हे विमान मेघानी नगर परिसरात कोसळल्यानंतर मोठा स्फोट (Ahmadabad Plane Crash) झाला. या स्फोटामुळे विमानामधील प्रवाशी आणि क्रू मेंबर्सच्या शरीराचा अक्षरश: कोळसा झाला. यामुळे त्यांचे मृतदेह देखील ओळखता येत नव्हते. परंतु, इतक्या भीषण अपघातामधून रमेश विश्वासकुमार (Ramesh Vishwashkumar) हा एकमेव प्रवासी बचावला. रमेश विश्वासकुमार यांना दुखापत झाली असली तरी ते अगदी चालत रुग्णवाहिकेपर्यंत गेले. रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी विमान अपघातावेळी नेमके काय घडले, याची माहिती दिली.

रमेश विश्वासकुमार हे भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक आहेत. ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भावासोबत भारतात आले होते. त्यांनी सांगितले की, अपघातानंतर मी उठलो तेव्हा माझ्या आजुबाजूला मृतदेह पडले होते. मी प्रचंड घाबरलो होतो. मी उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो. माझ्या अवतीभवती सगळीकडे विमानाचे तुकडे पसरले होते. त्यानंतर काही लोकांनी मला धरले आणि रुग्णालयात आणले, असे रमेश विश्वासकुमार यांनी सांगितले.

Air India Plane Crash Video: अख्ख्या विमानात एकटे रमेश विश्वासकुमार कसे वाचले?

या भीषण दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला. मात्र, एकटे रमेश विश्वासकुमार कसे वाचले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रमेश विश्वासकुमार यांनी विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी उडी मारली की शेवटपर्यंत विमानातच बसून होते, याविषयी नेमकी खातरजमा होऊ शकलेली नाही. मात्र, रमेश विश्वासकुमार हे विमानातील 11ए या आसनावर बसले होते. त्यांचा भाऊ अजय विमानात वेगळ्या रांगेत बसला होता. रमेश विश्वासकुमार हे विमानातील इमर्जन्सी एक्झिटजवळ बसेल होते. त्यामुळे अपघात होतोय असे वाटताच ते या इमर्जन्सी दरवाजातून रमेश विश्वासकुमार यांनी उडी टाकली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. रमेश विश्वासकुमारने यापेक्षा अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र, त्याची प्रकृती ठीक झाल्यानंतर तपास यंत्रणांना त्याच्याकडून माहिती घेऊन हा विमान अपघात नेमका कसा झाला, हे कळण्यास मदत होऊ शकते.

आणखी वाचा

विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं... कुणालाच वाचवण्याची संधी मिळाली नाही : अमित शाह

चमत्कार ! एअर इंडियाच्या विमानातील भीषण अपघातातून विश्वशकुमार रमेश बचावला, अपघाताचा घटनाक्रम सांगितला...