नवी दिल्ली : पाकिस्तानचा भारतविरोधी कटाचा आणखी एक प्रयत्न समोर आला आहे. पाकिस्ताननं आता खलिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने भारताविरुद्ध कुरापती करण्याचा डाव आखला आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभर हाय अलर्ट जारी केला आहे.
या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर लष्कर आणि पोलीस दलातील अधिकारी आहेत, अशी माहिती समोर येत आहे. राजधानी दिल्लीतील डझनभर लोक या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत एक यादीही जारी केली आहे.
खलिस्तानी दहशतवाद्यांचे पाकिस्तानसोबतचे संबंध लपून राहिलेले नाहीत. पाकिस्तान गेल्या अनेक वर्षापासून खलिस्तान समर्थकांना भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटना खलिस्तानी दहशतवाद्यांना समर्थन करत असल्याची माहिती गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात समोर आली होती. गेल्यावर्षी खलिस्तानमधील फुटीरतावादी नेता गोपाल सिंह आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची भेट झाली होती.
खलिस्तानमधील दहशतवादी खलिस्तान या वेगळ्या देशाची मागणी करत आहेत. पंजाबमधील शिख बांधवांनी 1973 मध्ये पंजाबला स्वतंत्र राज्य मानण्याचा प्रस्ताव पारित केला होता. हाच प्रस्ताव खलिस्तान आंदोलनाची सुरुवात असल्याचं मानलं जातं.