मुंबई: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेल्या 27 वर्षीय रवी वर्माविरुद्ध चौकशी सुरू आहे. असे म्हटले जात आहे की त्याला एका पाकिस्तानी गुप्तहेराने हनीट्रॅपमध्ये अडकवले होते. कंपनीचे नाव आणि त्याचा वैयक्तिक नंबर सार्वजनिक ठेवून, वर्मा सहजपणे पाकिस्तानी कटाचा बळी ठरला. भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसला तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय अंतर्गत काम करणाऱ्या पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (PIO) च्या महिला एजंट्सनी आरोपी रवी वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिमकार्डचा वापर केला होता. तपासात दिसून आले आहे , पीआयओच्या महिला एजंट्सनी जाणूनबुजून भारतीय सिमकार्डचा वापर केला जेणेकरून रवी वर्मा आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांना हे संभाषण पाकिस्तानमधून होत आहे हे कळू नये.

Continues below advertisement

भारतीय नागरिक म्हणून ओळख देऊन वर्मा यांच्याशी संपर्क साधला

महिला एजंट्सनी स्वतःला भारतीय नागरिक म्हणून ओळख देऊन वर्मा यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना आमिष दाखवले आणि युद्धनौका आणि पाणबुड्यांसारखी संवेदनशील संरक्षण माहिती, फोटो आणि व्हिडिओ मागितले. एटीएसच्या सूत्रांनुसार, आरोपीशी संपर्क साधण्यात आलेले सर्व 5-6 मोबाईल नंबर हे भारतीय सिमकार्ड आहेत. हे सिमकार्ड पाकिस्तानी एजंट्सना कोणी आणि कसे पुरवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एटीएसने या संदर्भात तपास अधिक तीव्र केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात असे ठोस संकेत मिळाले आहेत की, पाकिस्तानी एजंट्सनी भारतीय नंबर वापरून रवी वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. या खुलाशानंतर, एटीएसने एक सार्वजनिक सूचना देखील जारी केली आहे, ज्यामध्ये नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी अज्ञात भारतीय आणि परदेशी नंबरवरून येणारे मेसेज किंवा कॉल गांभीर्याने घ्यावेत आणि त्यांना प्रतिसाद देऊ नयेत. तसेच, अशा कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा मेसेजबद्दल तातडीने पोलिसांना कळवावे. सूत्रांनी पुढे सांगितले की, ही एक वेगळी घटना नाही. तपासात असे दिसून आले आहे की, पीआयओ एजंट केवळ रवी वर्माच नाही तर भारतातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारे भारतीय सिम कार्डद्वारे अनेक लोकांना लक्ष्य करत आहेत. ही त्यांची नवीन कार्यपद्धती आहे, जी पहलगाम हल्ल्यानंतर उघडकीस आली आहे.

Continues below advertisement

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी हसन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली, जो पाकिस्तानी एजंटना भारतीय सिम कार्ड पुरवण्यात सहभागी होता. आता महाराष्ट्र एटीएस दिल्ली पोलिसांशी सतत संपर्कात आहे, जेणेकरून हसनचा रवी वर्मा प्रकरणाशी काही संबंध आहे का हे शोधता येईल. सूत्रांनी सांगितले की, नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान, रवी वर्माला पाकिस्तानी एजंट्ससोबत गुप्त माहिती शेअर करण्याच्या बदल्यात सुमारे 9000 रुपये देण्यात आले होते, असेही तपासात उघड झाले आहे. हे पैसे मृत खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले, ज्याचे विश्लेषण अजूनही सुरू आहे.

महिलेच्या मोबाईलमध्ये सापडले काही संशयस्पद ॲप

एलओसी पार करून पाकव्यात काश्मीरमध्ये जाणाऱ्या महिलेच्या मोबाईल मध्ये सापडले काही संशयस्पद ॲप सापडल्याची माहिती समोर आली आहे. एलओसी पार करून पाक व्याप्त पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या महिलेने सोशल मीडिया द्वारे पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केली आहे. सुरुवातीला व्यवसायानिमित्ताची ( रत्न, खडे यांच्या व्यवसाय बद्दल) चॅटिंग आहे. मात्र नंतर वेगळ्या पद्धतीची चॅटिंग आहे. सोशल मीडिया चॅटिंग वरून तिचे पाकिस्तानी नागरिकांसोबत संबंध दिसून येत आहे.

14 मे रोजी एलओसी क्रॉस केली. कारगिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष कायदे अन्वये तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारगिल टीम संबंधित महिलेला ताब्यात घेण्यासाठी नागपुरात आली असून प्राथमिक चौकशी ही केली आहे आणि आता लीगल प्रोसिजर करून तिला सोबत घेऊन जाणार आहे. तिचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते. त्यावरूनच सोशल मीडिया चॅटिंग्स उघड झाल्या आहेत. एलओसी क्रॉस करण्यासाठी तिला काही स्थानिक लोकांनी (काश्मीर मधील लोकांनी) मदत केल्याचे समोर आले आहे. कारगिल पोलीस त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहे. त्यानंतर लोकल सपोर्ट संदर्भात स्पष्टता येईल. त्या महिलेचे पाकिस्तानमधील जुल्फिकार नावाच्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त एका धर्मगुरू (ख्रिश्चन धर्मगुरू) सोबतही चॅटिंग झाल्याचे समोर आले आहे. त्या सोबतच्या चॅटिंगमध्ये पाकिस्तानात कसं जायचं या संदर्भातलीच चर्चा आहे इतर दुसरे काहीही नाही.

ही महिला नऊ दिवस पाकिस्तानी एजन्सीसच्या ताब्यात होती, त्यानंतरच पाकिस्तानी एजन्सीने महिला आणि तिचा मोबाईल भारताला सोपवलं आहे. जेव्हा ही महिला पाक व्याप्त काश्मीरमध्ये गेली होती, त्यावेळेस अत्यंत तणावाचे वातावरण होते. त्या काळातच नऊ दिवस पाकिस्तानी एजन्सीची ताब्यात होती. त्यामुळे पाकिस्तानी एजन्सीने तिच्या मोबाईलमध्ये काही स्पायवेअर किंवा मालवेअर टाकले आहे का याची चौकशी आम्ही करून घेतली आहे. मोबाईल मध्ये काही संशय निर्माण करणारे ॲप्स आढळले आहे. त्या ॲप्सचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक तपासामध्ये त्याबद्दल स्पष्टता येईल. एनआयए मुंबईने नागपूर पोलिसांना संपर्क साधून त्यांची प्रश्नावली पाठवली आहे. त्या उत्तराच्या आधारावर एनआयए पुढचा निष्कर्ष काढणार आहे आणि मग स्पेशल टीम नागपुरात पाठवली जाणार आहे.