पाककडून नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार, दोन भारतीयांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 13 May 2017 10:41 PM (IST)
नवी दिल्ली : पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमा परिसरात बेछूट गोळीबार केला आहे. पाक रेंजर्सनं नौशेरा सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात दोन भारतीयांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. पाकिस्तान लष्करानं आज राजौरीमध्ये मॉर्टर हल्ला केला. या घटनेनंतर सीमा भागातील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं कामही थांबवण्यात आलं आहे. तर नौशेरा, किला दरहल आणि मंजाकोट गावांमधल्या शाळा अनिश्चित काळासाठी बंद कऱण्यात आल्या आहेत. पाक रेंजर्स गेल्या तीन दिवसांपासून सतत गोळीबार करत आहेत. जम्मूतील अर्नियातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरही पाकने गोळीबार केला. इथं कुंपण घालण्याचे काम करणाऱ्या भारतीय जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकने केला. त्या आधी बुधवार आणि गुरुवारीही पाकने गोळीबार केला होता. यात एक भारतीय महिला ठार झाली होती दरम्यान, पाक रेंजर्स सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार करत आहेत. भारतीय जवानही पाकला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पण यात सीमा भागात राहणाऱ्या गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.