Punjab : पंजाबमध्ये (Punjab) सीमा सुरक्षा दलाकडून (BSF) दहशतवादी कारवायांविरोधात कारवाई सुरू आहे. एएनआयकडून नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानातून  (Pakistan) अमृतसरमध्ये (Amritsar) येणारे आणखी एक ड्रोन पाडले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा ड्रोन चाहरपूर गावाजवळ भारतीय हद्दीत घुसखोरी करताना दिसला, ज्यानंतर सैन्याने गोळीबार केला आणि पाकिस्तानच्या तस्करीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला.


परिसरात नाकाबंदी, सुरक्षा यंत्रणा सतर्क
भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांना भारतीय हद्दीतील अमृतसरच्या चाहरपूरजवळील भागात पाकिस्तानच्या दिशेने येणाऱ्या ड्रोनचा आवाज आला. यानंतर जवानांनी या ड्रोनवर गोळीबार केला. सध्या या परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून इतर संबंधित यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले आहे.


 






 



26 नोव्हेंबरलाही पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले होते
यापूर्वी 26 नोव्हेंबरला पंजाबमधील अमृतसर येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. त्याच दिवशी, पंजाबमधील पठाणकोटमध्ये सीमेजवळ दोन जण घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. बीएसएफने त्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. 2021 च्या तुलनेत भारतीय हद्दीत पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीमध्ये वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी भारत-पाकिस्तानच्या सीमेवर सुमारे 230 ड्रोन दिसले आहेत, तर 2021 मध्ये ही संख्या 104 होती. त्याच वेळी, 2020 मध्ये हा आकडा 77 होता.


यापूर्वीही पाकिस्तानी ड्रोन पाहण्यात आले आहेत


यापूर्वी 15 नोव्हेंबरला भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन दिसला होता. पंजाबमधील पठाणकोटमधील बामियाल सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांना सीमेजवळ एक ड्रोन दिसला. बीएसएफ जवानांच्या गोळीबारानंतर त्याला पाकिस्तानच्या दिशेने परत धावावे लागले.


2020 पासून 297 ड्रोन दिसल्याची नोंद


2020 पासून पंजाबमध्ये किमान 297 ड्रोन दिसल्याची नोंद झाली आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरात, जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये ड्रोनच्या संशयास्पद हालचाली देखील आढळून आल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानची इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) या ड्रोनद्वारे शस्त्रे आणि ड्रग्ज पाठवत असल्याचं समोर आलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


iNCOVACC Intra-Nasal Vaccine: भारत बायोटेककडून iNCOVACC Intra-Nasal कोविड लशीला मंजुरी