पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे काल (रविवारी)कर्करोगामुळे निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना असा परिवार आहे. पर्रिकरांच्या पार्थिवावर आज (सोमवारी)मिरामार बीचवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. पर्रिकरांच्या निधनामुळे गोव्यासह देशभरात शोकाकूल वातावरण आहे.


सकाळी 9.30 ते 11 वाजेपर्यंत मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव पणजी येथील भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी हजारो नागरिकांनी पर्रिकरांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर पर्रिकरांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गोवा कला अकादमी येथे हलवण्यात आले. चार ते पाच तास कला अकादमीमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. 5.30 वाजता अंत्यविधी सुरु करण्यात आले. सायंकाळी 6 च्या दरम्यान पर्रिकरांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला.

आज गोव्यासह देशभारतील अनेक नेत्यांनी पर्रिकरांचे अंत्यदर्शन घेतले. सकाळी साडेदहा वाजता केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पणजी येथील भाजपा कार्यालयात जाऊन पर्रिकरांना अभिवादन केले. दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारमण गोव्यात दाखल झाले. मोदींकडून मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आला. दुपारी तीनच्या दरम्यान केंद्रीय मंत्री सुरेभ प्रभू आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यादेखील अंत्यदर्शनासाठी गोव्यात दाखल झाल्या होत्या. यावेळी इराणी यांना अश्रू अनावर झाले होते. संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवा कला अकादमीत पर्रिकरांचे अंतिम दर्शन घेतले.