नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रीय रायफल दलाच्या एका जवानाला पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याचा दावा पाक लष्करानं केला आहे. भारतीय जवानानं चुकून नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी पार केली. त्यामुळं पाकिस्तानच्या लष्करानं भारतीय जवानाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते आहे.


भारतानं काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दावे-प्रतिदावे सुरु आहेत. दरम्यान, पाक लष्करानं पकडलेल्या जवानाचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. पण या जवानानं चुकून नियंत्रण रेषा ओलांडली आणि त्यानंतर पाकनं त्याला ताब्यात घेतलं अशी प्राथमिक माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील 'डॉन' या वेबसाइटनं दिलेल्या वृत्तात असं म्हटलं आहे की, हा जवान महाराष्ट्रातील आहे. पण नियंत्रण रेषा ओलंडलेला जवान हाच महाराष्ट्रातील जवान आहे का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे भारतीय लष्कराकडून जवानाबाबत जेव्हा नेमकी माहिती देण्यात येईल त्यानंतरच याबाबतचं चित्र स्पष्ट होईल.