नवी दिल्ली : पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी कॅम्प पुन्हा सक्रीय झाल्याची माहिती राज्यसभेत बुधवारी देण्यात आली आहे. गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार बालाकोट येथील दहशतवादी कॅम्पवर पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहे. दहशवादी संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारताविरोधात धार्मिक आणि जिहादी कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.


इंडियन एअर फोर्सने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. काँग्रेस खासदार अहमद पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली.

भारताच्या अखंडतेसाठी आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे सरकारकडून सांगण्यात आले. सप्टेंबर महिन्यात लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बालाकोटमधील जैशचे तळ सक्रीय झाल्याची माहिती दिली होती. 500 दहशतवादी घुसखोरीसाठी तयार असल्याचे रावत म्हणाले होते.

जैशच्या बालाकोटमधील दहशतवादी तळावर हालचाली सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवादी गट भारताविरोधात धार्मिक आणि जिहादी कार्यक्रम सुरु करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सुद्धा सरकारने सांगितले.

जम्मू काश्मीरमध्ये यावर्षी 17 नोव्हेंबरपर्यंत 594 आतंकवादी हल्ल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये 37 नागरिक आणि 79 सुरक्षा रक्षक मारले गेले आहे.

रेड्डी म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये 2018 च्या दरम्यान आतंकवादी हल्ल्याच्या 614 घटना घडल्या आहेत. यामध्ये 39 नागरिक आणि 91 सुरक्षा रक्षक मारले गेले आहेत. ऑक्टोबर 2019 पर्यंत दहशतवाद्यांकडून 171 घुसखोरीचे प्रयत्न झाले आहे. तर 2018 मध्ये घुसखोरीची संख्या 328 होती.