नवी दिल्ली : भारताच्या दबावानंतर अखेर पाकिस्तानने 26/11 हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदच्या संघटनांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवादी हाफिजची जमात-उद-दावा आणि फलह-ए-इंसानियत फाऊंडेशन या संघटनांवर पाकिस्तानने कारवाई सुरु केली आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने हाफिजच्या या संघटनांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात 40 पेक्षा जास्त सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती.

या हल्ल्यानंतर भारताने आंतराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर कारवाई करण्यासंबंधी प्रयत्न सुरु केले होते. त्यानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या अध्यक्षतेखाली आज (गुरुवारी) राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत या संघटनांवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

जमात-उद-दावा ही संघटना दहशतवादी हाफिज सईद याच्या नेतृत्वात चालवली जात होती. या संघटनेच्या नेटवर्कमध्ये 300 मदरसे आणि शाळा, एक रुग्णालय, एक प्रकाशन, एक अॅम्ब्युलन्सचा समावेश आहे. जमाद-उद-दावा आणि फलह-ए-इंसानियत या संघटनांमध्ये तब्बल 50,000 स्वंयसेवक आणि शेकडो पगारधारी कर्मचारी आहेत, अशी माहिती पाकिस्तानी गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.