नवी दिल्ली: पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे आता समोर आलं आहे. इतकंच नाही तर हा हल्ल्याचा कट आखण्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांचा थेट सहभाग असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली. मुनीर यांच्या इशाऱ्यावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवरचा भ्याड हल्ला अमलात आणला. त्याचा कट कसा रचला आणि त्यात कुणाकुणाचा सहभाग आहे? पाहुयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट.
Pahalgam Terrorist Attack Mastermind : पहलगाम हल्ल्याचे मास्टरमाईंड
आसिम मुनीर -पाकिस्तानी लष्करप्रमुख
सैफुल्लाह कसुरी -लश्कर-ए-तोयबाचाा कमांडर
अबू मुसा -दहशतवादी
इद्रिस शाहीन - दहशतवादी
मोहम्मद नवाज -दहशतवादी
अब्दुल्ला खालिद -दहशतवादी
अब्दुल रफा रसूल- दहशतवादी
दहशतवाद्याचे हे सात चेहरे... ज्यांच्या इशाऱ्यावर पहलगामच्या हिरव्या नंदनवनाला रक्तानं लाल करण्यात आलं. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण कट पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी रचला.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना परदेशी पाठवलं
पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला आणि त्यावर पाकिस्तानात घुसून कारवाई करण्याची मागणी होत आहे. भारतानं सीमेवर दहशतवाद्यांविरोधात अंतिम प्रहार करण्याची तयारी केली आहे. हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि पाकिस्तानी लष्करुप्रमुख मुनीर आता लपण्याची ठिकाणं शोधताहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, आसिम मुनीरसह पाकिस्तानी लष्कराच्या टॉप अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना परदेशात पाठवलंय. खासगी विमानानं त्यांना इंग्लंड आणि न्यूजर्सीकडे रवाना करण्यात आलं. भारताकडून सडेतोड उत्तर मिळण्याच्या भीतीनं पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांची ङाबरगुंडी उडाल्याचं चित्र आहे.
आसिम मुनीरचं काश्मीरवर भाषण
तो आसिम मुनीरच होता ज्यानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सहा दिवस आधी दहशतवाद्यांना ग्रीन सिग्नल दिला होता. 16 एप्रिललाच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ट्रिगर पॉईंट इस्लामाबादमधून दाबला गेला. इस्लामाबादमध्ये आयोजित ओवरसीज पाकिस्तानी संमेलनात आसिम मुनीरने कट्टरवादावर लेक्चर झाडलं. 'कश्मीर पर हमारा और सरकार का रुख साफ है! कश्मीर हमारे गले की नस थी, नस है और रहेगी, हम इसे नहीं भूलेंगे!' असं तो म्हणाला.
आसिम मुनीरनं दबक्या आवाजात जे म्हटलं तेच त्याचे हँडलर आणि पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला कसुरीनं जाहीररित्या म्हटलं होतं. लवकरच काश्मीर पाकिस्तामध्ये असेल असं तो म्हणाला होता.
पहलगामच्या रक्तरंजित कटाला मूर्त स्वरूप देणारा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी सैफुल्ला कसुरीच होता ज्यानं हिंदूंना टार्गेट करून हत्या करण्याचा प्लॅन बनवला होता. सूत्रांच्या माहितीनुसार 19 फेब्रुवारीला पाकिस्तानी लष्करासोबत झालेल्या या बैठकीनंतर कसुरीनं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या कसूर शहरात पोहोचला. जिथं त्यानं फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अबू मुला, इद्रिस शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रफा रसूल आणि अब्दुल्ला खालिदसोबत बैठक घेतली.
याच बैठकीत पहलगाम हल्ल्याचा कट शिजवण्यात आला आणि 22 तारखेला सीमा ओलांडून आलेल्या दहशतवाद्यांनी त्याला अंतिम स्वरूप दिलं. त्या दहशतवाद्यांचा आका पाकिस्तानातच आहे हे आता जगजाहीर झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केल्याप्रमाणं त्या आकाला कायमची अद्दल घडवावी लागेल.
ही बातमी वाचा: