पुणे : केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यातील (Pahalgam Terrorist Attack) संशयित दहशतवाद्यांचे फोटो जारी केल्यानंतर त्यासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. ते दहशतवादी हल्ल्याच्या चार दिवसांपूर्वी म्हणजे 18 एप्रिल रोजी पहलगामपासून साडेसात किमी अंतरावर असलेल्या बेताब व्हॅली (Betaab Valley) या ठिकाणी होते. त्यांची हालचाल पुण्याच्या एका पर्यटकाच्या व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. श्रीजीत रमेशन असं या पर्यटकाचं नाव असून त्यांच्या मुलीच्या रील्समध्ये दोन दहशतवादी कैद झाले आहेत. या प्रकरणाचा तपास एनआयए (NIA) करत आहे. 

Continues below advertisement

काश्मीर येथील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा जीव गेला. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या पर्यटकांचा जीव घेणाऱ्या पाच दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आले आहेत. देहूरोडमधील रहिवासी असलेले श्रीजीत रमेशन हे देखील त्याचवेळी काश्मीरमध्ये परिवारासोबत पर्यटनासाठी गेले होते. पहलगामपासून साडेसात किलोमीटरवर असलेल्या बेताब व्हॅली याठिकाणी श्रीजीत आणि त्यांचे कुटुंबीय गेले होते. 

Pahalgam Terror Attack Video : रील्समध्ये दहशतवादी कैद

बेताब व्हॅली याठिकाणी गेल्यानंतर श्रीजीत हे आपल्या मुलीचा रिल्स काढत होते. हे रिल्स काढणं सुरू असतानाच दोन संशयित दहशतवादी या मुलीच्या पाठीमागून जात असल्यानं कैद झालं आहे. श्रीजित रमेशन यांनी याबाबतची माहिती NIA (National Intelligence Agency) ला दिली असून या व्हिडीओ आणि फोटोची संपूर्ण तपासणी केली जात आहे. 

Continues below advertisement

नेमकं काय झालं? 

श्रीजीत रमेशन हे 18 एप्रिल रोजी, म्हणजे हल्ल्याच्या चार दिवस आधी पहलगाममध्ये होते. त्यानंतर त्या ठिकाणाहून साडे सात किमी अंतरावर असलेल्या बेताब व्हॅली या ठिकाणी ते गेले. त्या ठिकाणी त्यांनी अनेक व्हिडीओ शूट केले. त्यामध्ये त्यांच्या मुलीच्या रील्सचाही समावेश आहे.

काश्मीरमध्ये फिरून झाल्यानंतर हे कुटुंब पुण्याला आले. त्यानंतर 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. तो हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो सरकारने जारी केला. त्या चार दहशतवाद्यांपैकी दोघांना कुठेतरी पाहिलं आहे असा संशय श्रीजीत रमेशन आणि त्यांच्या पत्नीला आला. त्यानंतर त्यांनी काश्मीरमधील संपूर्ण व्हिडीओ आणि फोटो चेक केले.

श्रीजीत रमेशन यांच्या मुलीच्या रील्समध्ये मागून दोन संशयित जात असल्याचं दिसून आलं. सरकारने जारी केलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघांचा फोटो त्याच्याशी मिळताजुळता असल्याचं श्रीजीत रमेशन यांची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील एनआयएच्या कार्यालयात कॉल केला आणि त्यांना तो व्हिडीओ पाठवला. आता एनआयए त्याचा तपास करत आहे. 

मात्र यामुळे काही महत्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत,

1) बेताब व्हॅलीमध्ये हे दहशतवादी मागील अनेक दिवसांपासून वास्तव्यास होते का? 2) बेताब व्हॅली या परिसरात ते मागील अनेक दिवसांपासून रेकी करत होते का? 3) बेताब व्हॅलीमध्ये या दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी किंवा लपण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे त्यांनी पहलगाम व्हॅली निवडली का? 4) बेताब व्हॅलीपेक्षा पहलगाम या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक येत असतात. त्यामुळे या दहशतवाद्यांनी पहलगाम हे ठिकाण निवडले का?