Pahalgam Terrorist Attack : 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. भारत सोडण्याची मुदत आज संपत आहे. दरम्यान, मुदत संपल्यानंतरही जर कोणी पाकिस्तानी देशात सापडला तर त्याला तुरुंगात टाकले जाईल आणि दंड ठोठावला जाईल.

Continues below advertisement


काय होणार शिक्षा?


केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानींना भारत सोडण्याची नोटीस जारी केली आहे. शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्यांसाठी 27 एप्रिल 2025 आणि मेडिकल व्हिसावर आलेल्यांसाठी 29 एप्रिल 2025 ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. जर कोणी पाकिस्तानी विहित मुदतीनंतरही भारतात राहत असल्याचे आढळले तर त्याला अटक करून तुरुंगात टाकले जाईल. त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि तीन लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांची ओळख पटवून त्यानुसार व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. भारत सरकारच्या सूचनेनंतर गेल्या तीन दिवसांत 509 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. तर 14 राजनैतिक अधिकाऱ्यांसह एकूण 745 भारतीय वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानातून परतले आहेत.


काय सांगतो नियम ?


इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल, 2025 च्या कलम 23 अन्वये, जे परदेशी नागरिक त्यांच्या व्हिसावर जास्त मुक्काम करतात, व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करतात किंवा भारतातील प्रतिबंधित भागात प्रवेश करतात त्यांना 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा 3 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याशी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा संबंध आल्याने भारत सरकारचे हे निर्देश आले आहेत, ज्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता.


अटारी सीमेवरुन पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले जात आहे. अटारी सीमेवरील पंजाब पोलिसातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसात अटारी सीमेवरुन 537 पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात गेले आहेत. तर याच काळात 850 भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्यासाठी दिलेली मुदत आज (27 एप्रिल) संपली आहे. वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी 29 एप्रिल ही अंतिम मुदत आहे. 12 प्रकारचे व्हिसा असलेल्यांना भारत सोडण्याची अंतिम मुदत 27 एप्रिल रोजी संपली आहे. ज्यांच्याकडे SAARC व्हिसा आहे, त्यांच्यासाठी भारत सोडण्याची अंतिम मुदत 26 एप्रिल होती. ज्यांच्याकडे वैद्यकीय व्हिसा आहे, त्यांच्यासाठी 29 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे दीर्घ मुदतीचा व्हिसा आहे त्यांना भारत सोडण्याच्या आदेशातून सूट देण्यात आली आहे.



महत्वाच्या बातम्या:


पाकिस्तानातून भारतात परतणाऱ्यानागरिकांची संख्या किती? पंजाब पोलिसांनी दिली महत्वाची माहिती