Ramdas Athawale on Pahalgam Terror Attack :  भारतात ज्या पाकव्याप्त काश्मिरातून दहशतवादी घुसखोरी करतात, तो भागचं भारताने काबीज करायला हवा. यासाठी युद्ध करावं लागलं तरी हरकत नाही, अगदी सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती केली तरी चालेल असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale ) यांनी केलं आहे. दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रामदास आठवलेंनी हे पर्याय सुचवले आहेत. पेहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack ) आठवले आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

रामदास आठवले यांनी आज लोणवळ्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार भूमिका घेतली. दहशतवादी हल्ले रोखायचे असतील तर पाकव्याप्त काश्मीर काबीज करणं, हाच एकमेव पर्याय असल्याचा सल्ला आठवलेंनी स्वतःच्या सरकारला दिला आहे. 

दहशतवादी हल्यात 26 जणांचा मृत्यू

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा निर्घृणपणे बळी गेला होता. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा या भागातील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे. भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शत्रूंना स्पष्ट संदेश दिला आहे की आता दहशतवादाविरोधातील कारवाई कोणत्याही स्तरावर मर्यादित राहणार नाही.

महाराष्ट्रातील 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे की, पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडावा. महाराष्ट्रात देखील ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा, असे फर्मान सरकारने काढले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील इशारा दिलेला आहे. महाराष्ट्रातील 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही, अशी माहिती समोर आली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंधू जल करारासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

 

महत्वाच्या बातम्या:

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदल सतर्क, हालचालींना वेग, अरबी समुद्रात क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्रांची चाचणी