परभणी : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून वक्फ (Waqf) कायद्यातील बदला विरोधात आज परभणीत संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात मार्गदर्शन करण्यासाठी MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसींची (Asaduddin owaisi) प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, बोलताना ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, वक्फ बोर्ड कायद्याविरुद्ध एकत्र येणं काळाजी गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्राला वाचवण्यासाठी दोन भाऊ एकत्र येवू शकतात, त्यामुळे आपल्यालाही एक व्हावे लागेल, असे म्हणत ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावरही ओवैसींनी भाष्य केलं. वक्फ कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, चंद्राबाबू, अजित पवार, नितीश कुमार आणि जयंत चौधरी यांच्यावरही ओवैसी यांनी टीका केली. 

Continues below advertisement


वक्फ बोर्डाबाबत केलेला हा काळा कायदा मोदींना परत घ्यावाच लागेल, असे ओवैसी यांनी म्हटले. आपल्या भाषणातून केवळ मोदीच नाही तर अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रबाबू नायडू नितीश कुमार, आणि जयंत चौधरी यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. तुम्ही आज बोलले नाहीत तर उद्या तुमचे नुकसानच होणार आहे. जर दोन भाऊ महाराष्ट्राला वाचवण्यासाठी एकत्र येऊ शकतात, तर आपल्यालाही एक व्हावं लागेल, असे आवाहन ओवैसींनी मुस्लिम बांधवांना केले. दरम्यान, या संमेलनादरम्यान पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहून पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांनी केलं. 


दरम्यान, राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान महाराष्ट्र खूप मोठा आहे, महाराष्ट्रापुढे आमचा वाद किरकोळ आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यावर भाष्य केलं होतं. तर, उद्धव ठाकरेंनीही एका भाषणात हा संदर्भ देत आपली एकत्र यायची तयारी आहे, असे म्हणत काही अटी घातल्या होत्या. त्यानंतर, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मनसे-शिवसेना एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी केली जात असल्याचं दिसून येत आहे. 


ओवैसींनी पाकिस्तानला ठणकावलं


एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले," देशाच्या प्रमुखांना मी मागणी करतो की त्यांनी पाकिस्तानची कोंडी करावी. आमच्या देशाच्या लष्कराचे जेवढे बजेट आहे तेवढे तुमच्या देशाचे आहे. तुम्ही आम्हाला धमक्या देऊ शकत नाहीत, काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे, असे म्हणत ओवैसींनी पाकिस्तानला ठणकावलं. तर, काश्मिरी पण आमचेच आहेत, आम्ही त्यांच्यावर संशय घेऊ शकत नाहीत. काश्मिरी नागरिकांबद्दल द्वेष पेरला जातोय. मात्र, आपल्याला एक राहावंच लागेल. पाकिस्तान आयएसआयएस, एलइटी यांना हेच पाहिजे आहे. भारतात हिंदू-मुस्लिम भांडण लागली पाहिजेत, असेही ओवैसींनी म्हटले. 


हेही वाचा 


सचिन बघाय चला, रोहित बघाय चला; मुंबई इंडियन्सच्या सपोर्टसाठी वानखेडेवर 19 हजार शाळकरी मुलं