मुंबई : पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात (Terror attack) 27 भारतीय पर्टटकांचा मृत्यू झाल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घटनेवर शोक व्यक्त करत दहशतवाद्यांना सोडणार नाही, अशा शब्दात इशारा दिलाय. तर, अमित शाह यांनी पहलगाम (Pahalgam) येथे भेट देऊन मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात आयबी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या तीन अधिकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यात, नेव्हीतील (Navy) लेफ्टनंट विनय नरवाल यांचा वीरगती प्राप्त झाली असून त्यांना नौदलाकडून आज मानवंदना देण्यात आली. त्यावेळी, त्यांच्या पत्नीने जय हिंद म्हणत श्रद्धांजली वाहिली, तो व्हिडिओ पाहून अनेकांच्या पोटात कालवलं.
भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी, विनय यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या पार्थिवाला सॅल्यूट करत मानवंदना दिली. आय एम प्राऊड ऑफ यू विनय इव्हरीटाईम जय हिंद... असे म्हणत विनयच्या पत्नीने डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली. आपल्या वीरगती प्राप्त केलेल्या पतीच्या मृतदेहासमोर 7 दिवसांच्या विधवेनं टाहो फोडल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते.
स्वित्झर्लंडऐवजी काश्मीरला फिरायला गेले
विनयच्या आजोबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, विनय हे पत्नीसोबत स्वित्झर्लंडला जाणार होते. पण, तिथला व्हिजा न मिळाल्याने काश्मीरला फिरायला गेले. हरयाणातील करनाल जिल्ह्याचे मूळ रहिवाशी असलेले विनय नरवाल हे 2 वर्षांपूर्वीच नौदलात भरती झाले होते.
भेळपुरी खातना मारलं, मृतदेहाजवळ बसली हिमांशी
हरियाणातील लेफ्टनंट विनय नरवाला यांचे सात दिवसांपूर्वी 16 एप्रिल रोजी लग्न झालं होतं. विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी हनिमूनसाठी फिरायला गेले होते. काश्मीरमधील पहलागाम येथे हे नवदाम्पत्य भेळपुरी खात असताना अतिरेक्यांनी विनय नरवाल यांना गोळ्या घातल्या. त्यामध्ये, वियन यांचा जागीच मृत्यू झाला, तर आपल्या मृत पतीच्या पार्थिवाजवळ बसून नवविवाहिता हिमांशी टाफो फोडत होती. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या घातल्याचं हिमांशीने म्हटलं होतं. हिमांशीचा व्हिडिओ आणि तिचा पतीच्या पार्थिवाजवळ बसलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर, देशभरात संताप व्यक्त केला जातोय. हाती लग्नातला चुडा भरलेला, 7 दिवसांपूर्वीचा आनंद दु:खाच्या शोकसागरात बुडाला आणि खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसल्याचं दिसून आलं.
मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली असून जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे, आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने - डोंबिवली2) संजय लेले - डोंबिवली3) हेमंत जोशी- डोंबिवली4) संतोष जगदाळे- पुणे5) कौस्तुभ गणबोटे- पुणे6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू2) सुबोध पाटील3) शोबीत पटेल