मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आता कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असून तीनही सैन्यदलांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या आधी भारताने पाच मोठे निर्णय घेतल्याने पाकिस्तानची (Pakistan) धाकधूक वाढली आहे. आता पाकिस्तानच्या माजी उच्चायुक्तांच्या एका वक्तव्याने त्या देशाच्या चिंतेत अधिक भर पडल्याचं दिसतंय. पुढच्या सात दिवसांमध्ये भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करणार असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित अली (Abdul Basit Ali) यांनी केलं. 


जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये (Jammu Kashmir Terrorist Attack) 26 पर्यटक मारले गेले. हा हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानमध्ये परत गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 


काय म्हणाले पाकिस्तानेच माजी उच्चायुक्त? 


कायदा आणि सुव्यवस्थेच्या अस्थिरतेसाठी पाकिस्तानने तयार राहावे असा इशारा पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित अली यांनी दिला. ते म्हणाले की, पहलगाममध्ये  झालेल्या हल्ल्यानंतर काही दिवसांतच भारत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करू शकतो. 


या आधीच्या 2016 च्या उरी हल्ल्यानंतर आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवायांचाही अब्दुल बासित अली यांनी उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील भाषणाचा संदर्भ देत ते म्हणाले की, "सीमेपलीकडून कधीही हल्ले होऊ शकतात. त्यानंतर भारत दावा करेल की त्यांनी लॉन्च पॅड आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. ते एका आठवड्यात घडेल किंवा येत्या 15 दिवसात घडेल." 


सिंधू पाणी वाटप करार (Indus Water Treaty) रद्द करण्याबाबत सध्या कोणतीही राजनयिक अडचण नाही असं सांगत अब्दुल बासित अली म्हणाले की, "सिंधू जल करार एकतर्फी संपुष्टात आणता येणार नाही. हा करार निलंबित केला जाऊ शकत नाही किंवा त्यात सुधारणा करता येणार नाही."


पाकिस्तानने जागतिक बँकेशी संपर्क साधावा


अब्दुल बासित अली यांनी पाकिस्तान सरकारने सिंधू जल कराराचा मध्यस्थ आणि हमीदार असलेल्या जागतिक बँकेशी संपर्क साधावा आणि जोरदार मुत्सद्दी प्रतिसाद तयार करावा असे आवाहन केले आहे. भारतावर आरोप करताना ते म्हणाले, "भारत आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांचे पालन करत नाही. ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आकांक्षांसाठी मोठी गोष्ट आहे."