बेळगाव : ‘काँग्रेस पक्ष आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या मला गेल्या तीन वर्षांपासून कर्नाटकात येऊ देत नव्हते. पण आता मला येथे येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांनी फक्त पाच मिनिटे माझ्याशी चर्चा करावी मी दोघांचीही दुकाने बंद करेन.’ अशा शब्दात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधी आणि मोदींवर टीका केली.


बेळगावमधील सीपीएड मैदानावर आयोजित निधर्मी जनता दलाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी ओवेसींनी भगवा फेटा परिधान केला होता. त्यामुळे उपस्थितांमध्ये त्याविषयी बरीच चर्चाही रंगली होती. ओवेसींनी भगवा फेटा परिधान केल्याने त्याबाबत सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, या सभेत ओवेसींनी पंतप्रधान मोदींवर बरीच टीकाही केली. ‘मोदींचा पराभव करण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे देशातील प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी केली पाहिजे. केवळ अल्पसंख्यांक नव्हे तर देशातील शोषित, दलित जनतेला  राजकीय अधिकार मिळाले पाहिजेत.’ असंही ओवेसी यावेळी म्हणाले.

यावेळी ओवेसींनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवरही निशाणा साधला. ‘उत्तर प्रदेश नंतर कर्नाटकचा क्राईम रेट अधिक आहे. अशी नॅशनल क्राईम ब्युरोची आकडेवारी सांगते.’ असं म्हणत ओवेसींनी सिद्धरामय्या सरकारवरही निशाणा साधला.