मुंबई : सध्या राजकारण्यांची लोकप्रियता ही त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या आकड्यांवर ठरवली जात आहे. याबाबतीत ट्विटरही विशेष महत्त्वाचं आहे. पण या प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह असलेल्या नेत्यांचे बरेचसे फॉलोअर्स फेक असल्याचंही समोर आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांसारख्या दिग्गज नेत्यांचे 60 टक्क्यांहून अधिक फॉलोअर्स फेक आहेत. देशातील वरिष्ठ नेत्यांचे किती ट्विटर फॉलोअर्स फेक आहेत, हे 'टाइम्स ऑफ इंडिया'ने ट्विटर ऑडिटच्या मदतीने समोर आणलं आहे.

काही महिन्यांपूर्वी ऑडिट केलेल्या अकाऊंट्समधून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे 61 लाख 15 हजार फॉलोअर्स आहेत, त्यापैकी 69 टक्के बनावट आहेत. तर एक कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या अमित शाह यांचे 67 टक्के फॉलोअर्स फेक आहेत. याशिवाय सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असलेले काँग्रेस नेते शशी थरुर यांचेही 62 टक्के फॉलोअर्स फेक आहेत.

पंतप्रधान मोदींचे 61 टक्के फॉलोअर्स बनावट
बनावट फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी 61 टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आम आदमी पक्षाचे' संयोजक अरविंद केजरीवाल यांचेही निम्म्यापेक्षा जास्त फॉलोअर्स फेक आहेत. तर नुकतंच राजकारणात पदार्पण केलेले दक्षिणात्य सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांचे 26 टक्के ट्विटर फॉलोअर्स फेक आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे 26 टक्के फॉलोअर्स फेक
ट्विटरवर फेक फॉलोअर्सचं प्रकरण एकट्या भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरीही आहे. ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचेही 48 टक्के ट्विटर फॉलोअर्स फेक आहेत. हिलरी क्लिंटन यांचे 31 टक्के आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे 26 टक्के फॉलोअर्स बनावट आहेत.

ट्विटर ऑडिटचं काम कसं चालतं?
ट्विटर ऑडिटच्या वेबसाईटनुसार, या टूलद्वारे 5,000 फॉलोअर्सचे नमुने घेतले जातात आणि त्यांचे ट्वीटस, फॉलोअर्स, म्युचुअल फॉलोज आणि इतर परिमाणांच्या आधारावर आकलन केलं जातं. यावरुन समजतं की किती ट्विटर फॉलोअर्स बनावट आहेत आणि किती खरे. मात्र ही अचूक पद्धत नाही. पण काही प्रमाणात अचूकतेच्या जवळ जाणारी आहे.