बेळगाव : ब्रह्मलिंग यात्रेच्या मुख्य दिवशी 'हर हर महादेव'चा गजर करत, शेकडो भाविक इंगळ्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. बसवन कुडची येथील ब्रह्मलिंग यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविक उपस्थित होते.

सोमवारपासून यात्रेला सुरुवात झाली असून मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस होता. सदर यात्रा गुढी पाडव्यापर्यंत चालणार आहे. मंगळवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत इंगळ्या कार्यक्रम पार पडला. शेकडो भाविक इंगळ्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सकाळपासूनच मंदिरात धार्मिक विधी पार पडले. सकाळी अभिषेक झाल्यावर महापूजा करण्यात आली. नैवेद्यही दाखवण्यात आला. नवस बोललेल्या अनेक भक्तांनी जत्रेच्या मुख्य दिवशी आपली नवसपूर्तता केली.



आजच्या इंगळ्या कार्यक्रमासाठी पाच हजारहून अधिक भक्तांनी काकती येथील डोंगरावर जाऊन सोमवारी लाकडे आणून ठेवली होती. काकती येथील डोंगरावरून इंगळ्यासाठी लाकडे आणण्याची परंपरा अनेक वर्षांपासून पाळली जाते.

बुधवारी यात्रेनिमित्त गावात खळ्याच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण बसवन कुडची गाव भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे.