Pondicherry University annual cultural fest: पुद्दुचेरी विद्यापाठीतील यंदाचा वार्षिक सांस्कृतिक सोहळा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे प्रचंड गाजत आहे. विद्यापीठाच्या 'एझिनी' या सांस्कृतिक सोहळ्यात 'सोमायनम' हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकातील एका प्रसंगावरुन सध्या वादंग निर्माण झाला आहे. या नाटकात रामायणातील (Ramayana) पात्रांचे विकृत आणि अपमानजक पद्धतीने चित्रण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यापीठातील हिंदू विद्यार्थी संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (ABVP) 'सोमायनम' नाटकाचे दिग्दर्शक आणि अन्य कलाकारांविरोधात तातडीने पोलीस कारवाई करण्याची मागणी केली आहे.


 




नेमका वाद काय?


अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदच्या कार्यकर्त्यांनी 'सोमायनम' नाटकातील काही प्रसंगांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. या नाटकात काल्पनिक व्यक्तीरेखांच्या माध्यमातून सीता आणि हनुमानाचा अपमान करण्यात आला आहे. नाटकातील एका प्रसंगात सीता रावणाला गोमांस खायला देत आहे. तसेच या नाटकात हनुमानाची व्यक्तिरेखा विकृत पद्धतीने मांडण्यात आली आहे. तसेच सीतेच्या अपहरणाचा प्रसंगही वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. याशिवाय, सीतेची अग्नीपरीक्षा ही अपमानकारक असल्याचा संदेश नाटकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.


अभविपच्या कार्यकर्त्यांनी 29 मार्चला या घटनेविरोधात आवाज उठवला होता. नाटकात रामायणाची खिल्ली उडवण्यात आल्याचे अभविपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठातील काही गट हिंदू देवतांची बदनामी करतात. नाटकाच्या माध्यमातून त्यांच्याकडून हिंदू धर्मातील रुढी-परंपरांच्या पावित्र्याविषयी शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विद्यापीठातील काहीजणांकडून धार्मिक भावना आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या गोष्टींचे विडंबन केले जाते, असे 'अभविप'च्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.






सीता आणि रावणातील वादग्रस्त प्रसंग


अभिवपच्या म्हणण्यानुसार, या नाटकात सीतेची कहाणी मांडण्यासाठी 'गीता' या व्यक्तिरेखेचा वापर करण्यात आला आहे. गीता नावाचे हे पात्र रावणासोबत (भावना) नाचताना दाखवण्यात आले आहे. सीतेच्या अपहरणाच्या प्रसंगापूर्वी सीता रावणाला गोमांस खाण्याविषयी विचारते, असे दाखवण्यात आले आहे. तसेच सीता रावणाला म्हणते की, मी विवाहित आहे, पण आपण मित्र होऊ शकतो. हा प्रसंग म्हणजे सीतेच्या पावित्र्याविषयी शंका उपस्थित करणार आहे. हे सर्व हिंदूधर्मीयांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणारे आहे, असे 'अभिवप'च्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा


 रामायण काळात अर्थव्यवस्था कशी होती? अर्थसंकल्प कसा मांडला गेला? जाणून आश्चर्य वाटेल