बंगळुरु : कर्नाटकात सत्ता स्थापनेचा दावा भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बीएस येडियुरप्पांनी राज्यपालांकडे केला आहे. यावर आता राज्यपाल वजुभाई वाला काय निर्णय देतात, याची प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रियाही येडियुरप्पांनी राज्यपालांना भेटीनंतर दिली.


येडियुरप्पा उद्याच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे मात्र भाजपचेच सहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा कर्नाटकातील काँग्रेस नेते एम.बी.पाटील यांनी केला. काँग्रेस-जेडीएस आपल्याकडे बहुमत असल्याच्या दाव्यावर ठाम आहे, त्यामुळे  राज्यपाल काय भूमिका घेतात आणि कर्नाटकात नेमकं कोण सत्तेत येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएससमोर काय पर्याय असेल, हा स्वाभाविक प्रश्न आहे. काँग्रेससमोर सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग आहे. शिवाय सर्व आमदार घेऊन राज्यपालांची भेट घेण्याचाही पर्याय काँग्रेससमोर आहे.

कर्नाटकातील सत्तेचा पेचप्रसंग

विधानसभा निवडणूक निकालानंतर आज कर्नाटकात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. कारण भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने कर्नाटकात मोठा पेच निर्माण झाला आहे. बहुमताचा 112 आकडा कोणालाही गाठता आला नाही.

कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं.

यामध्ये भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या आहेत.  तर काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या आहेत. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचं बळ आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018

भाजप 104

काँग्रेस 78

जनता दल (सेक्युलर) 37

बहुजन समाज पार्टी 1

कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

अपक्ष 1

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या 7 लिंगायत आमदारांवर भाजपची मदार


कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स, काँग्रेसकडून 100 रुम बूक


कर्नाटकात भाजपची काल रात्री एक जागा कमी झाली, आज वाढली!