पाटना : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. विरोधक या कारवाईचे पुरावे मागून आपल्या जवानांचे खच्चीकरण करत असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. बिहारच्या पाटणा येथे आज एनडीएकडून संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, या रॅलीदरम्यान एका भाषणात मोदी बोलत होते.


मोदी म्हणाले की, "भारतीय वायु सेनेने पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये घुसून 'जैश ए मोहम्मद'च्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. सरकारने जवानांचे मनोबल वाढवले. सध्या दहशतवादाविरोधात आपण आपली एकजूट दाखवण्याची गरज आहे. त्याच वेळी दिल्लीत 21 पक्ष एनडीएविरोधात ठराव मांडत आहेत. परंतु नागरिक या विरोधकांना माफ करणार नाहीत. भारत आता त्यांच्या वीरांच्या बलिदानानंतर पूर्वीसारखा गप्प बसत नाही उलट चुन चुन के बदला लेता है"

दरम्यान काही वेळापूर्वी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी वायुसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे जगासमोर ठेवण्याची मागणी मांडली आहे. दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, "काही वर्षांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू असलेल्या ओसामा बिन लादेनवर कारवाई केली. त्याचा अड्डा उध्वस्त करुन त्याला ठार केले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेने लादेनला ठार केल्याचे पुरावे जगासमोर ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे."

काँग्रेसकडून सातत्याने मोदींवर टीका केली जात आहे. राहुल गांधी प्रत्येक सभेत 'चौकीदार ही चोर है' अशी घोषणा देतात. यावर मोदी यांनी आज उत्तर दिले मोदी म्हणाले की, "चौकीदार चोर नही चौकन्ना है, आणि देशाला लुटणारे या चौकीदारामुळे हैराण आहेत."