दिल्ली : विरोधी पक्षातील 12 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवून मोफत व्यापक कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या पक्षांनी म्हटले आहे, की सर्व बेरोजगारांना दरमहा सहा हजार रुपये द्या, गरजूंना मोफत धान्य द्या. लाखो 'अन्नदात्याला' साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी नवीन कृषी कायदे रद्द करा.
विरोधी पक्षनेत्यांनीही सरकारला त्यांच्या सूचनांना प्रतिसाद देण्याची विनंती केली आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हे पत्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्यासह ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, स्टॅलिन यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांकडून पत्र लिहण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर पीपल्स अलायन्सतर्फे फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, माकपचे सरचिटणीस डी राजा आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे पत्र पाठविणार्या नेत्यांमध्ये आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला विरोधी नेत्यांनी कोरोना साथीच्या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. मागच्या वेळीच्या पत्रात मायावती यांचे नावदेखील समाविष्ट होते, जे या वेळी नाही.
पत्रात करण्यात आलेल्या मागण्या
- केंद्रीय स्तरावर लस खरेदी करुन प्रत्येकाला लस देण्याची मोहीम सुरू करा
- सक्तीच्या परवान्याद्वारे देशात लस उत्पादन वाढवा
- अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या 35 हजार कोटीतून लसीकरणावर खर्च करावा
- सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवा आणि वाचलेली रक्कम ऑक्सिजन आणि लसींवर खर्च करा
- पीएम केअरमध्ये जमा केलेली रक्कम ऑक्सिजन, लस, औषध, वैद्यकीय उपकरणांवर खर्च करा
- सर्व बेरोजगारांना दरमहा 6 हजार रुपये द्या
- गरजू लोकांना मोफत धान्य द्यावे.
- कोरोनाला बळी पडणार्या आंदोलनशील शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी कृषी सुधार कायदे मागे घ्या.