Opposition Parties Meeting News Updates : 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी एकजूट करण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांसाठी 17-18 जुलै ही तारीख खूप महत्त्वाची आहे. या दोन्ही दिवशी पुन्हा एकदा विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यापूर्वी विरोधकांची पाटण्यात एक सभा झाली होती, त्यानंतर आज आणि उद्या विरोधक बंगळुरूमध्ये (Bengaluru) एकत्र येणार आहेत. या बैठकीचा अजेंडा आणि मिनिट टू मिनिटाचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला असून, त्यामुळे या बैठकीत तरी विरोधी एकजुटीच्या दिशेनं विरोधक ठोस निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात पाटणा येथे नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक धोरण ठरवण्याच्या दृष्टीनं अनिर्णितच होती. बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही. आता या पार्श्वभूमीवर 17-18 जुलै रोजी होणारी बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
दोन दिवसीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष
या बैठकीकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, कारण पहिल्या आणि दुसऱ्या सभेच्या या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. आजवर विरोधी एकजुटीचे सर्वात मोठे नेते म्हणून पाहिले जाणारे शरद पवार यांच्याच पक्षात बंड झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे प्रबळ नेते अजित पवार यांनी थोरल्या पवारांची साथ सोडत भाजपची कास धरली. अजित पवार सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत, तर त्यांच्या अर्थ खात्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. अशातच आज विरोधकांच्या बैठकीचा भाग असलेल्या बंगळुरूतील डिनरला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच, टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या डिनरपासून आधीच स्वतःला दूर केलं आहे. मात्र, 18 जुलै रोजी होणाऱ्या चर्चेत ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत.
अशा स्थितीत विरोधी एकजुटीचा कार्यक्रम कसा असेल? त्याचा खास अजेंडा काय? जाणून घेऊयात मिनिट टू मिनिटाचा कार्यक्रम कसा असेल?
17 जुलै रोजी विरोधकांचं डिनर
आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टींनुसार, विरोधकांची बैठक 6-8 वाजण्याच्या सुमारास आयोजिक करण्यात येणार आहे. ही एक औपचारिक बैठक असणार आहे आणि यानंतर 8 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांद्वारे सर्व विरोधी पक्षांसाठी रात्री स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 18 जुलैला सर्व बैठका सकाळी 11 वाजता सुरू होतील आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाळ उपस्थित राहणार आहेत.
विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी अजेंडा
17-18 जुलै, बंगळुरू
1. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यासाठी उप-समितीची स्थापना आणि युतीसाठी आवश्यक संवादाचे मुद्दे
2. पक्षाच्या परिषदा, रॅली आणि दोन पक्षांमधील विरोधाभास दूर करण्यासाठी उपसमिती तयार करणं
3. राज्याच्या आधारावर जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करणं
4. EVM च्या मुद्द्यावर चर्चा करणं आणि निवडणूक आयोगासाठी सुधारणा सुचवणं
5. युतीसाठी नाव सुचवणं
6. प्रस्तावित युतीसाठी महासचिवालय स्थापन करणं
मिनट-टू-मिनट कार्यक्रम
17 जुलै 2023
6.00 वाजता काँग्रेस अध्यक्षांद्वारे स्वागताचं भाषण
6.10 वाजता मसुदा अजेंड्यावर मसुद्याच्या अजेंड्यावर थोडक्यात चर्चा
18 जुलै 2023 रोजी सकाळी 7 वाजताच्या सभेच्या कार्यसूचीला मंजुरी देणं
7.30 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्नेहभोजन
18 जुलै 2023
सकाळी 11.00 वाजता काँग्रेस अध्यक्षांकडून कार्यक्रमपत्रिकेचा परिचय
सकाळी 11.10 वाजता अजेंड्यावर चर्चा
1.00 वाजता दुपारचं जेवण
दुपारी 2.30 वाजता उपगट आणि सचिवालयाची स्थापना
3.30 वाजता सभा संपणार
सायंकाळी 4.00 वाजता संयुक्त पत्रकार परिषद
शरद पवार-ममता बॅनर्जी यांची डिनरला अनुपस्थिती
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 17 जुलै रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीत आयोजित केलेल्या रात्रीच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार नाहीत. गुडघ्याच्या नुकत्याच झालेल्या मायक्रोसर्जरीनंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र 18 जुलै रोजी होणाऱ्या अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबतच्या बैठकीत त्या सहभागी होणार आहेत. टीएमसीच्या वतीने अभिषेक बॅनर्जी डिनरला उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, शरद पवार 17 जुलै रोजी मुंबईत आपल्या आमदारांची भेट घेणार आहेत, त्यामुळे ते देखील बंगळुरूतील बैठकीत रात्रीच्या जेवणाला उपस्थित राहणार नाहीत.
विरोधकांच्या बैठकीला कोणत्या राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार?
1. काँग्रेस : सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाळ
2. टीएमसी: ममता बनर्जी, अभिषेक बनर्जी
3. सीपीआई: डी राजा
4. सीपीआईएम: सीताराम येचुरी
5. एनसीपी: शरद पवार, जितेंद्र आव्हाड, सुप्रीया सुळे
6. जदयू: नितीश कुमार, ललन सिंह, संजय झा
7. डीएमके: एमके स्टालिन, टी. आर बालू
8. आम आदमी पार्टी: अरविंद केजरीवाल
9. झारखंड मुक्ति मोर्चा: हेमंत सोरेन
10. शिवसेना (UBT): उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत
11. आरजेडी: लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, मनोज झा, संजय यादव
12. समाजवादी पार्टी: अखिलेश यादव, राम गोपाल यादव, जावेद अली खान, लाल जी वर्मा, राम अचल राजभर, आशिष यादव
13. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फ्रस: उमर अब्दुल्ला
14. पीडीपी: महबूबा मुफ्ती
15. सीपीआई (ML): दीपांकर भट्टाचार्य
16. आरएलडी: जयंत सिंह चौधरी
17. इंडियन यूनियन मुस्लिम लीग: केएम कादर मोहिदीन आणि पीके कुणाली कुट्टी
18. केरळ काँग्रेस (M): जोश के मणि
19. एमडीएमके: थिरु वाइको, जी रेणुगादेवी
20. वीसीके: थिरु थिरुमावालवन, रवि कुमार
21. आरएसपी: एनके प्रेमचंद्रन
22. केरला काँग्रेस: पीजे जोसेफ, फ्रांसेस जॉर्ज के
23. केएमडीके: थिरु ई.आर ईस्वरम, एकेपी चिनराज
24. एआईएफबी: जी देवराजन