Opposition Alliance: भाजप विरोधी पक्षांची काल (मंगळवारी) बंगळुरूमध्ये (Bengaluru) दुसरी महाबैठक पार पडली. या बैठकीत सर्व विरोधी पक्षांच्या आघाडीचं नाव जाहीर करून विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलं. बंगळुरूमध्ये दोन दिवसांच्या मंथनानंतर मंगळवारी (18 जुलै) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आणि आमच्या आघाडीचं नाव 'भारत' (INDIA) असेल, असं जाहीर केलं. ज्याचा फुल फॉर्म 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स' (INDIA), असा असेल, असंही खर्गेंनी जाहीर केलं. काँग्रेसच्या अध्यक्षतेखाली भाजप विरोधी पक्षांची ही दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडली.  


विरोधकांच्या बैठकीतील काही रंजक गोष्टीही समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली. अरविंद केजरीवाल यांनी सर्व पक्षांना जागावाटप लवकरात लवकर सुरू करण्याचं आवाहन केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे त्वरीत केलं पाहिजे, अन्यथा खूप उशीर होईल, असं मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं. 


राहुल गांधींनी दिले राज्यांमध्ये युती करण्याचे संकेत 


याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. मी खात्री देतो की, काँग्रेस भाजपविरोधात वैचारिक मोहीम राबवत आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना पाठिंबा देण्यास तयार आहोत. असं म्हणत राहुल गांधी यांनी अखिलेश यादव आणि नितीश कुमार यांच्यासारख्या नेत्यांना राज्यांमध्ये युती करण्याचे संकेत दिले.


बैठकीत विरोधकांच्या एकजुटीसाठी 'ही' नावे प्रस्तावित 


विरोधकांच्या बैठकीत इंडिया हे नाव टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रस्तावित केलं आणि त्याला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी भारत जोडो आघाडी हे नाव सुचवलं आणि राहुल यांची भारत जोडो यात्रा यशस्वी झाली, त्यामुळे हेच नाव कायम ठेवलं पाहिजे, असं मुफ्ती म्हणाल्या. या वेळी इतर अनेक नावंही प्रस्तावित करण्यात आली.


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 'इंडियन मेन फ्रंट'चा प्रस्ताव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी यूपीए 3, सीपीआयएम नेते सीताराम येचुरी यांनी 'वी फॉर इंडिया', जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी 'भारतीय' नावाचा प्रस्ताव मांडला. छोट्या पक्षांनीही काही नावं सुचवली. या बैठकीत नाव, सीएमए, समन्वय समिती, सचिवालय आणि संयुक्त मोहीम यावर चर्चा झाली.


तीन समित्या स्थापन करणार 


विरोधकांच्या महाबैठकीत 3 समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. समान किमान कार्यसूचीसाठी एक उपसमिती, प्रचारासाठी दुसरी उपसमिती आणि तिसरी समन्वय समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा बैठकीत करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार फार शांत होते. पण भाजप केंद्रीय यंत्रणांच्या मदतीनं त्रास देत आहे, धमक्या देत आहे, जे राष्ट्रवादीचं झालं तेच भविष्यात इतर पक्षांसोबत होईल, असं वक्तव्य शरद पवार यांनी बैठकीत केलं. विरोधकांची पुढील बैठक 15 ऑगस्टनंतर मुंबईत होणार आहे.