नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून सर्व आवश्यक गोष्टींसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे. यामध्ये तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड कनेक्ट करण्याचाही समावेश आहे. मात्र अद्याप सर्वांच्याच बँक खात्याशी आधार कार्ड कनेक्ट झालेलं नाही. त्यामुळे भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटीने (युआयडीएआय) बँकांना याबाबत सर्व आवश्यक ते उपाय करण्याचा आदेश दिला आहे.

बँकांनी 30 सप्टेंबरपर्यंत 10 टक्के शाखांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरु करावं. अन्यथा 1 ऑक्टोबरपासून 20 हजार रुपये प्रती शाखा याप्रमाणे दंड आकारण्यात येईल, असा आदेश युआयडीएआयने दिला आहे.

ऑगस्टमध्येच बँकांना 10 टक्के शाखांमध्ये आधार नोंदणी केंद्र उपलब्ध करुन देण्याची सूचना केली होती. मात्र काही बँकांनी यासाठी आणखी वेळ मागितला होता. आता बँकांना 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे, असं युआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण पांडे यांनी सांगितलं,

बँकांना प्रत्येक 100 शाखांपैकी 10 शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन द्यावी लागेल. अन्यथा दंड वसूल केला जाईल, असंही भूषण पांडे यांनी स्पष्ट केलं.