‘’काँग्रेसचे पुढील अध्यक्ष दोन जण असू शकतात. एक मुलगा, किंवा दुसरी आई. कारण आपण निवडणूक लढायला तयार असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. मात्र त्यासाठी विरोधकाची गरज असते. एखादा विरोधक मिळाला तर चांगली गोष्ट आहे. निवडणूक होईल. विरोधकच नसल्यास निवडणूक कशी होईल’’, असा सवाल मणिशंकर अय्यर यांनी केला. हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये ते बोलत होते.
राहुल गांधींची दिवाळीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अय्यर यांनी हे वक्तव्य केलं. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी याबाबत संकेत दिले होते.
राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी पक्षात भावना आहे. राहुल गांधी उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचं बरंच काम पाहतात. मात्र त्यांना आता जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये सध्या पक्षांतर्गत निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील, असं सचिन पायलट यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.