न्यूयॉर्क : महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल हे अनिवासी भारतीय होते, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स स्क्वेअर’ मधील अनिवासी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी ही भूमिका मांडली.


काँग्रेसची चळवळ ही एनआरआय अर्थात अनिवासी भारतीयांनी उभी केली हे सांगताना त्यांनी ही उदाहरणं दिली. ते म्हणाले की, "गांधी, नेहरु आणि इतर सगळ्यांकडे भारताबाहेरच्या जगाचा अनुभव होता. भारतात परतल्यावर या सगळ्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग देश उभारणीसाठी केलं."

ते पुढे म्हणाले की, "महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद हे सर्व अनिवासी भारतीय होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं."

तसेच धवलक्रांतीचे जनक व्हर्गीस कुरियन यांच्या योगदानाबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "अनिवासी भारतीयांच्या देशाप्रती योगदानाचं योग्यप्रकारे मुल्यमापन झालं नाही. व्हर्गीस कुरियन हे त्यातीलच एक होते. त्याच प्रकारे सॅम पित्रोदा यांनी परदेशातून मायदेशी परतल्यानंतर भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावली."

विशेष म्हणजे, 14 दिवसांच्या आपल्या दौऱ्यात राहुल गांधींनी तिथल्या राजकीय व्यक्ती, विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांच्यासोबत भारतातील वाढती असहिष्णूता, आणि साप्रदायिक तेढ यावर सर्वांनी चिंता व्यक्त केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही जोरदार हल्लाबोल चढवला.

मोदी सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, "केंद्र सरकार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात अपयशी ठरत आहे. सध्या 30 हजार तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. पण त्यातील केवळ 450 जणांनाच रोजगाराच्या संधी मिळतात. जर हे प्रमाण असेच सुरु राहिले, तर भविष्यात तरुणांसाठी वाट अतिशय अवघड होईल."

काय म्हणाले राहुल गांधी?