नवी दिल्ली : कोरोना विरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरण मोहीम वेगाने व्हावी यासाठी कोरोना लसीकरणासाठी आता कोविन (Cowin) प्लॅटफॉर्वर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन लोक ऑन दी स्पॉट लस घेऊ शकतात अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं की, आता कोरोना लसीकरणासाठी आधी रजिस्ट्रेशन करुन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. 18 वर्षांवरील नागरिक आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करुन लस घेऊ शकतात. सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि मोबाईल इंटरनेट न वापरणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. 


कोरोना लसीकरणासाठी आधी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन अनिवार्य होतं. यावर सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारला फटकारले होते. 


आतापर्यंत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 27 कोटी 28 लाख 31 हजार 900 लसींचा मोफत पुरवठा केंद्र सरकारकडून तसेच राज्यांना थेट खरेदी सुविधेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यापैकी, राज्यांनी एकूण 25 कोटी 45 लाख 45 हजार 692 लसींच्या मात्रांचा वापर केला आहे. ही आकडेवारी आज सकाळी आठ वाजताच्या प्राथमिक आकड्यांवर आधारित आहे. 1 कोटी 82 लाख 86 हजार 208) लसींच्या मात्रा अद्याप राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असून त्या देण्याचे काम सुरु आहे.