कोलकाता : बॉलिवूड अभिनेता आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती वाढदिवसाच्याच दिवशी काहीसे अडचणीत आले आहेत. बंगालच्या निवडणुकांच्या दरम्यान, प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी आज मिथुन चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. व्हर्च्युअल पद्धतीनं ही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि असंवैधानिक भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 


नेमका आरोप काय? 
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दरम्य़ान, मिथुन यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचे आरोप लावत मानिकतल्ला पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये चक्रवर्ती यांनी 7 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ‘‘मारबो एकहने लाश पोरबे शोशाने’ (तुमचा खात्मा केल्यास मृतदेह स्मशानात जातील) आणि ‘ एक छोबोले चाबी’ (सर्पदंशानंच तुम्ही छायाचित्रात कैद व्हाल) अशी वक्तव्य केली, ज्यामुळंच राज्यात निवडणुकांनंतर हिंसा उसळली असं म्हटलं गेलं. 


लष्कराच्या सामानाची ने-आण करण्यासाठी फ्रेट कॉरिडोरची चाचणी ; रेवाडीहून राजस्थानला पोहोचलं सामान


न्यायालयाकडून चक्रवर्ती यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश 
निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या या आरोपांच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.


पुढे उच्च न्यायालयानं चक्रवर्ती यांना त्यांचा ई-मेल राज्याकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिला होता. जेणेकरुन सदर प्रकरणीच्या चौकशीसाठी ते व्हर्च्युइली सहभागी होऊ शकतील. दरम्यान, आपली बाजू मांडताना एफआयआर रद्द करण्याची मागणी करत आपण फक्त चित्रपटातील संवादच म्हटले होते अशी सारवासारव केल्याचं कळत आहे.