श्रीनगर : जम्मू-काश्मिरच्या बटमालूमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादी यांच्यात सुरू असलेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे, तर तीन जवान जखमी झाले आहेत. बटमालू परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सुरक्षा यंत्रणेनं ही कारवाई सुरू केली होती.

जम्मू काश्मिरचे डीजीपी एसपी वैद यांनी ट्विटरवर माहिती दिली की, दहशतवाद्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर बटमालू येथे शोधमोहीम सुरू करण्यात आली. भारतीय जवान घटनास्थळी पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा एक जवान शहीद झाला आहे. तसेच या चकमकीत जम्मू काश्मिर पोलिसांचा एक जवान आणि सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाल्याची माहितीही वैद यांनी दिली.


शहीद जवान एसओजी एसपीच्या पीएसओची जबाबदार सांभाळत होता. पहाटे चार वाजल्यापासून ही चकमक सुरू असून सुरक्षा यंत्रणेने एका दहशवाद्याला घेरलं असल्याची माहिती समोर येत आहे.