लखनौ: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचं उत्तर प्रदेश कनेक्शन समोर आलंय. हे कनेक्शन साधंसुधं कनेक्शन नसून फोन कनेक्शन आहे. फोन करणारे असतील महाराष्ट्रात विखुरलेले उत्तर प्रदेशी लोक आणि त्यासाठीचं कॉल सेंटर असेल ते चक्क उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लखनौैतल्या घरात! मुंबईसह महाराष्ट्रातल्या उत्तर प्रदेशी लोकांच्या समस्या जाणून त्यांचं निराकरण करण्याच्यानिमित्तानं त्यांना पक्षाशी जोडण्याचं काम, या हेल्पलाईनद्वारे करण्यात येणार आहे.


महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक अशा शहरांत लाखो उत्तर भारतीय राहतात. त्यांच्यात उत्तर प्रदेशातून आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. या हेल्पलाईनद्वारे हे लोक आपली समस्या सांगतील, त्यांच्या गाऱ्हाण्यांना संबंधित विभागांपर्यंत पोहोचवलं जाईल शिवाय त्यांच्या तक्रारीचं काय झालं तेसुद्धा कळवलं जाईल.

केशव प्रसाद मौर्य यांना महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी बनवण्यात आलंय. भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेन्द्र यादव हेसुद्धा निवडणूक प्रभारी आहेत. राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम बघता मौर्य यांनी मुंबईतच लोअर परळ भागात घर घेतलंय. जिथे ते पक्ष कार्यकर्ता आणि सामान्य लोकांना भेटतील. एकट्या मुंबईतच काही लाख उत्तर प्रदेशी राहतात. यातील काही शारीरिक कष्टाची कामं तर काही अगदी बांधकाम व्यावसायिकसुद्धा आहेत. यूपीतल्या जौनपूरमधले हजारो लोक इथं रिक्षा आणि टॅक्सी चालवतात. नुकतेच काँग्रेस सोडलेले कृपाशंकर सिंह किंवा समाजवादी पार्टीचे अबु आझमी हे मूळचे यूपीचेच रहिवासी.

मौर्य यांच्यावर महाराष्ट्रातल्या उत्तर प्रदेशी लोकांशी संपर्काची जबाबदारी देण्यात आल्यावर त्यांनी हे कॉल सेंटर सुरू केलं. मौर्य यांन मुंबईत अनेक यूपीवासियांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. मुंबईत किंवा उत्तर प्रदेशमध्येही त्यांच्या मूळ गावात जमीन-जुमला, भांडण-तंटे अशा समस्या कुणीही ऐकून घेत नसे. यामुळेच ही हेल्पलाईन सुरू करत असल्याचं मौर्य यांनी सांगितलं.