दिल्ली येथील एम्स रुग्णालयामधून आल्यानंतर मुख्यमंत्री पर्रिकर यांचे फोटो मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केले. या फोटोंमध्ये पर्रिकरांची तब्येत खालावली असल्याचे पहायला मिळाले. गोव्यातील विरोधी पक्ष काँग्रेसने प्रत्येक वेळी मुख्यमंत्री घेत असलेल्या प्रत्येक बैठकीचा पुरावा म्हणून व्हिडिओ प्रसिद्ध केला जावा, अशी मागणी केली आहे. परंतु मुख्यमंत्री कार्यालय पर्रिकर यांचे केवळ फोटोच प्रसिद्ध करत असल्यामुळे या फोटोंवर आक्षेप घेतला जात होता.
त्यानंतर मनोहर पर्रिकर सोफ्यावर बसलेले असतानाचा एक फोटो मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केले. त्यावरुनदेखील विरोधकांनी उलट सुलट चर्चा सुरु केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उभे राहून पायाभरणी दगडाचे अनावरण करताना दिसत असल्याने हा फोटोसुद्धा चर्चेत येणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या फेसबुक पेजवर आणि ट्विटर हैंडलवर हा फोटो प्रसिद्ध केला आहे.