तृणमूल काँग्रेसचे आमदार मुनीरुल इस्लाम यांनी आज (बुधवारी) भाजपत प्रवेश केला आहे. इस्लाम यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे नेते गदाधर हाजरा, मोहम्मद आसिफ इकबाल आणि निमई दास या तिघांनीदेखील भाजपत प्रवेश केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून मोठं यश मिळवणाऱ्या भाजपने काल तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला होता. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे आमदार शुभ्रांशु रॉय आणि तुषार कांती भट्टाचार्य यांच्यासह 50 पेक्षा जास्त नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. तसेच सीपीएम आमदार देवेंद्र रॉय यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला. ही घटना ताजी असतानाच आज टीएमसीचा अजून एक आमदार भाजपच्या गळाला लागला आहे.
लोकसभा निवडणूक संपल्यानंतरही भाजप आणि टिएमसीमधील वाद सुरुच आहे. लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान मोदींनी ममता दीदींचे 40 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता ममता यांचे तीन आमदार भाजपमध्ये गेले आहेत. तसेच भाजपमध्ये इतर नेत्यांचेही इनकमिंग सुरु झाले आहे.
पश्चिम बंगालमधल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षीय बलाबल
टीएमसी 22
भाजप 18
काँग्रेस 2