मुंबई: उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका ISI एजंटला अटक केली आहे.  जावेद असं त्याचं नाव असून, त्याला आग्रापीड्यातून अटक करण्यात आली.

यापूर्वी एटीएसने फैजाबाद आणि मुंबईतून दोन पाकिस्तानी गुप्तहेर आफताब अली आणि अल्ताफ कुरेशी यांना अटक केली होती.

यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने काल नागपाड्यातून आयएसआय एजंट अल्ताफ कुरेशीला अटक केली होती. त्याच्याकडे तब्बल 70 लाख रुपये सापडले होते. त्यानंतर आज त्याचा साथीदार जावेद यालाही बेड्या ठोकल्या.

अल्ताफच्या चौकशीतूनच जावेदला पकडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

जावेदला पाकिस्तानने पैसे जमा करण्याचं काम सोपवलं होतं. त्याच्या सांगण्यावरुनच अल्ताफ कुरेशीनं खात्यात पैसे जमा केले होते.



यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने आफताब आणि अल्ताफची कसून चौकशी केली. त्यादरम्यान मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी मुंबईतील आग्रीपाडा भागात छापेमारी केली. तिथेच या दोघांचा साथीदार जावेदला अटक करण्यात आली.

जावेदनेच पाकिस्तानच्या सांगण्यावरुन आफताबच्या खात्यात पैसे भरल्याचे पुरावे मिळाले आहेत.

अल्ताफ कुरेशी हा आयएसआयसाठी हवाला ऑपरेटर म्हणून काम करायचा. उत्तर प्रदेशातील फैजाबादमधून अटक केलेला आयएसआय संशयित अफताब अली यालाही अल्ताफ कुरेशी पैसे पुरवायचा, अशी माहिती मिळते आहे.

दोन्ही गुप्तहेर भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होते.

दरम्यान, आफताब अलीने पाकिस्तानात जाऊन आयएसआयचं ट्रेनिंग घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्याजवळ संशयित कागदपत्र, काही नकाशे, दहशतवादी साहित्य आणि अनेक चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.