On This Day In History : देशाच्या नौदलासाठी 8 डिसेंबरची तारीख विशेष महत्त्वाची आहे. याच तारखेला 1967 मध्ये पहिली पाणबुडी 'कलवरी' भारतीय नौदलात सामील झाली होती. या पाणबुडीने 30 वर्षे देशाची सेवा केली. त्यानंतर 31 मार्च 1996 रोजी कलवरी नौदलातून सेवामुक्त झाली. या पाणबुडीला हिंद महासागरात सापडणाऱ्या धोकादायक टायगर शार्कच्या नावावरून हे नाव देण्यात आले. यानंतर विविध श्रेणीतील अनेक पाणबुड्या नौदलाचा भाग बनल्या. फ्रान्सच्या सहकार्याने स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक स्कॉर्पीन श्रेणीची पाणबुडी 2017 मध्ये नौदलात सामील करण्यात आली होती आणि तिला देखील कलवरी असे नाव देण्यात आले आहे. कलवरी ही जगातील सर्वात घातक पाणबुड्यांपैकी एक मानली जाते.
1720 : बालाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवा यांचा जन्म
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांचा जन्म 8 डिसेंबर 1720 रोजी पुणे येथे झाला. नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना 25 जुन 1740 रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. 1761 च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्याने 23 जून 1761 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
1935: अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्मदिन
बॉलीवूडचे हीमन म्हटले जाणारे धर्मेंद्र यांचा आज जन्मदिन आहे. धर्मेंद्र हे त्यांच्या काळातील सर्वात हँडसमअभिनेत्यांपैकी एक होते. धर्मेंद्र एकेकाळी बॉलिवूडचे 'ही-मॅन' आणि 'अॅक्शन किंग' म्हणून देखील ओळखले जायचे.1960 मध्ये त्यांनी अर्जुन हिंगोरानीच्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून पदार्पण केले. धर्मेंद्र यांनी 1966 मध्ये रिलीज झालेल्या 'फूल और पत्थर' या चित्रपटातून अॅक्शन हिरो म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. यातच 'शोले' हा बॉलीवूडमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे आणि हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने धर्मेंद्र यांना सुपरस्टार बनवले.
1937 : भारतातील पहिली दुमजली बस मुंबईत धावली
मुंबईत बेस्टची पहिली बस वाहतूक 15 जुलै 1926 पासून सुरू झाली. त्यापूर्वी मुंबईत ट्रॅम धावत होती. कालांतराने यात बदल होत गेले आणि एकमजली बसच्या जोडीलाच दुमजली बसही प्रवाशांच्या सेवेत आली. बेस्टची पहिली दुमजली बस 1937 साली मुंबईकरांच्या सेवेत आली.
1944: अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्मदिन
शर्मिला टागोर या बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. शर्मिला टागोर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. शर्मिला टागोर यांनी आपल्या करिअरची सुरुवात सत्यजित रे यांच्या 'अपूर संसार' या बंगाली चित्रपटातून केली होती. यानंतर त्यांनी 'काश्मीर की कली'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्या शम्मी कपूरसोबत दिसल्या होत्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर त्यांनी 'वक्त', 'अनुपमा', 'देवर', 'अमर प्रेम', 'सफर', 'आराधना', 'मालिक', 'छोटी बहू', 'राजा रानी' असे अनेक हिट चित्रपट दिले. राजेश खन्ना व्यतिरिक्त शशी कपूरसोबत त्यांची जोडी अधिक पसंत केली गेली.
1985: सार्क परिषदेची स्थापना
1970 मध्ये ज्यावेळी बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यासारख्या देशांना एकत्रित येवून व्यापार करण्याची आणि सहकार करण्याच्या गरज वाटू लागली त्यावेळी या सर्व देशांनी मिळून एक संस्था दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क) स्थापन केली. आणि ही संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हा दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करणे त्याचबरोबर सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करणे आहे. देशांनी सार्क या संस्थेची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी ढाका या ठिकाणी केली. सार्क सदस्य देशांचे क्षेत्रफळ हे जगाच्या क्षेत्राच्या 3 टक्के आहे.