मुंबई: आज सप्टेंबर महिन्यातील 22 वा दिवस. आजच्या दिवशी देश आणि जगभरात अशा काही घटना घडल्या होत्या ज्या आपल्याला माहिती असायला हव्यात. भारताला ब्रिटिशांच्या गुलामीच्या खाईत ढकलणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या (East India Company) स्थापनेचा प्रस्ताव आजच्याच दिवशी म्हणजे 22 सप्टेंबर रोजी मांडण्यात आला होता. तसेच शिख धर्माची स्थापना करणाऱ्या गुरु नानक (Guru Nanak) यांचे निधनही आजच्याच दिवशी झालं होतं. 


1599- भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव


ईस्ट इंडिया कंपनीने (East India Company) व्यापाराच्या निमित्ताने भारतात प्रवेश केला आणि साम्राज्यवादी धोरण अवलंबून भारतीय सत्ता हस्तगत केली. भारतासोबत मसाल्याचा आणि इतर गोष्टींचा व्यापार करण्यासाठी ब्रिटनमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या कंपनीच्या इतिहासात 22 सप्टेंबर या तारखेला मोठं महत्व आहे. 22 सप्टेंबर 1599 साली लंडनमधील बड्या व्यापारांची फाऊंडर हॉल या ठिकाणी एक बैठक झाली आणि त्यामध्ये भारतासोबत व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल समजलं जातंय. नंतर 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीचा स्थापना करण्यात आली. 


1539- शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांचे निधन 


शिख धर्माचे संस्थापक आणि शिख धर्माचे पहिले गुरू नानक साहेब (Guru Nanak) यांचे 22 सप्टेंबर 1539 रोजी निधन झालं. सध्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कर्तारपूर या ठिकाणी त्यांचे निधन झाले. हे ठिकाण शिख समुदायासाठी अत्यंत पवित्र असून ते आता डेरा बाबा नानक या नावाने ओळखलं जातं. 


1792- फ्रान्स प्रजासत्ताकाची स्थापना 


आजच्याच दिवशी 1792 या दिवशी नॅशनल कन्व्हेंशनने फ्रान्सची (France) राजेशाही संपल्याची आणि देशात प्रजासत्ताक स्थापन झाल्याची घोषणा केली होती. 1792 ते 1795 या काळात सत्तेत असलेल्या नॅशनल कन्व्हेंशनने फ्रान्सला लहान-लहान तुकड्यात विखुरण्यापासून वाचवलं आणि एकसंघ ठेवलं. 21 सप्टेंबर 1792 साली नागरिकांनी राजेशाही समाप्त करण्यासाठी मतदान केलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राजेशाही संपल्याची घोषणा करण्यात आली. फ्रान्समध्ये राजेशाही आणि सरंजामी लोकांच्या आलिशान जीवनशैलीसाठी सामान्य लोकांना कर भरावा लागायचा. त्या प्रमाणात त्यांना सुविधा मात्र मिळायच्या नाहीत. फ्रान्समधील राजेशाहीविरोधात लोकांमध्ये संताप निर्माण झाला आणि त्याची परिणीती फ्रान्समधील राजकीय क्रांतीमध्ये झाली. 


1903- इटालो मार्चिऑनी यांना आयस्क्रीम कोनसाठी पेटंट 


आयस्क्रीम (Ice Cream) हे जगभरातील सर्व वयोगटातील लोकांचे आवडते खाद्य. हे आयस्क्रीम वेगवेगळ्या प्रकारात मिळतं. त्यातही कोन हा प्रकार अधिक लोकप्रिय आहे. याच आयक्रीमच्या कोनाचे पेटंट 22 सप्टेंबर 1903 रोजी अमेरिकेच्या इटोला मोर्चिऑनी यांना मिळालं. 


1949- रशियाने पहिल्या अणुबाँबची चाचणी केली 


दुसऱ्या महायुद्धानंतर जगात अमेरिका (US) आणि रशिया (Russia) या दोन महासत्ता निर्माण झाल्या आणि जग दोन गटात विभागलं गेलं. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलवादी देश तर रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी देश. या दोन देशांदरम्यान सर्वच स्तरावर स्पर्धा सुरू झाली आणि शीतयुद्धाला तोंड फुटलं. या दोन देशातील स्पर्धा शस्त्रास्त्रांच्या बाबतीतही सुरू झाली. त्यातून रशियाने 22 सप्टेंबर 1949 रोजी त्याच्या पहिल्या अणुबॉंबची (Atom Bomb) चाचणी घेतली.


1955 : ब्रिटनमध्ये टेलिव्हिजनचे व्यावसायिकरण सुरू, सहा मिनीटांची जाहिरात 


ब्रिटनमध्ये टेलिव्हिजनच्या व्यावसायिकरणाला 22 सप्टेंबर 1955 रोजी सुरुवात झाली. यामुळे प्रत्येक तासाला सहा मिनिटांची जाहिरात प्रदर्शित करण्याची मंजुरी देण्यात आली. रविवारी सकाळी मात्र या जाहिराती प्रदर्शित करता येणार नव्हत्या.  


1965- भारत-पाकिस्तामध्ये युद्ध विराम घोषित 


भारत आणि पाकिस्तानमध्ये (India-Pakistan War) 1965 साली पहिले युद्ध झाले होते. या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं. नंतर संयुक्त राष्ट्राने यामध्ये हस्तक्षेप करत 22 सप्टेंबर 1965 रोजी युद्ध विराम जाहीर केला. 


1988- नॅशनल जिओग्राफिक मॅग्झिनचे प्रकाशन 


नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या 'नॅशनल जिओग्राफिक मॅग्झिन'ची (National Geographic Magazine) आजच्याच दिवशी, 22 सप्टेंबर 1988 रोजी सुरुवात झाली होती. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या स्थापनेनंतर नऊ महिन्यानी या मॅग्झिनची स्थापना झाली. या मॅग्झिनमध्ये प्रामुख्याने विज्ञान, भूगोल, इतिहास आणि जागतिक संस्कृतीबद्दल लिखान केलं जातं. जगभरातील सर्वाधिक प्रतिष्ठीत मॅग्झिनपैकी हे एक मॅग्झिन आहे. आपल्या रंगीबेरंगी आणि आकर्षक फोटोंसाठी याची विशेष ख्याती आहे. 


2011- मन्सुर अली खान पतौडी यांचे निधन 


मन्सुर अली खान पतौडी (Mansoor Ali Khan Pataudi) हे एक भारतीय क्रिकेटपटू आणि पतौडीचे नवाब होते. सन 1969 साली त्यांचा विवाह बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी झाला होता. केवळ 21 व्या वर्षी ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार बनले होते. टायगर पतौडी या नावाने ते प्रसिद्ध होते. 22 सप्टेंबर 2011 साली फुफ्फुसांच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले होते.