मुंबई: सप्टेंबर महिन्यातील 8 तारीख ही जगाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. 8 सप्टेंबर 1960 साली भारताचे राजकारणी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी यांचं निधन झालं होतं. तसेच शिक्षणाबद्दल जागृती करण्यासाठी युनेस्कोने 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली. जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या. 


1926- भूपेने हजारिका यांचा जन्मदिवस


प्रसिद्ध गायक, संगीतकार, अभिनेते आणि कवी भूपेन हजारिका यांचा आज जन्मदिवस आहे. 


1933- आशा भोसले यांचा जन्मदिवस  


बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिवस आहे. आशा भोसले यांनी बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आशा भोसले यांनी 20 भाषांमध्ये 12 हजाराहून जास्त गाणे गायले आहेत. 


1943- इटलीची दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती


दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 8 सप्टेंबर 1943 या दिवशी इटलीने दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्करली. इटलीने युद्धविरामाच्या करारावर बिनशर्त सही केली. 


1960- फिरोज गांधी यांचे निधन


भारतातील प्रसिद्ध राजकारणी आणि माजी खासदार फिरोज गांधी यांचे आजच्याच दिवशी निधन झालं होतं. फिरोज गांधी हे भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी याचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतरच्या काळात या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. नंतरच्या काळात इंदिरा गांधी या काँग्रेसमध्ये कार्यरत झाल्या. फिरोज गांधी हे उत्कृष्ठ संसदपट्टू म्हणून ओळखले जायचे. 


1962- चीनची भारताच्या पूर्व सीमेवर घुसखोरी 


'हिंदी चीनी भाई-भाई' असा नारा देणाऱ्या चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. 8 सप्टेंबर 1962 रोजी चीनेने भारताच्या पूर्व सीमेवर घुसखोरी केली. 


1966- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 


जगभरात शिक्षणाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी युनेस्कोने 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्याचं जाहीर केलं. 8 सप्टेंबर 1966 या दिवशी पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. साक्षरता हा मानवाधिकार असून तो प्रत्येकाला मिळावा हा उद्देश यामागे आहे. 


1974- वॉटरगेट प्रकरणी रिचर्ड निक्सन यांना माफी


अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील गाजलेल्या वॉटरगेट प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना माफी देण्यात आली. निक्सन यांच्यानंतर सत्तेत आलेल्या राष्ट्रपती गेरॉल्ड फोर्ड यांनी ही माफी दिली. 


1982- शेख मोहम्मद अब्दुल्ला यांचे निधन


प्रसिद्ध राजकारणी शेख अब्दुल्ला हे शेर-ए-कश्मीर म्हणून ओळखले जायचे. त्यांनी भारताच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. शेख अब्दुल्ला यांनी ऑल जम्मू अॅन्ड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्सची स्थापना केली. जम्मू काश्मीर संस्थानाचे ते पहिले निवडून आलेले पंतप्रधान होते. नंतरच्या काळात जम्मू काश्मीर भारतात विलिन झाल्यानंतर ते जम्मूचे मुख्यमंत्री बनले. 


1988- अफगानिस्तानमधून रशियाच्या माघारीला सुरुवात


शीतयुद्धकालात अमेरिका आणि रशिया या दोन देशांदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला होता. अफगाणिस्तान हा अमेरिकेच्या भांडवलवादी गटातील सहकारी होता. त्यामुळे शेजारच्या रशियाने अफगाणिस्तानला धडा शिकवण्यासाठी त्यावर आक्रमण केलं. पण अमेरिकेने अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांना शस्त्रांचा पुरवठा केला आणि रशियाविरोधात आव्हान निर्माण केलं. त्यामुळे रशियाची मोठी नाचक्की झाली आणि रशियाला मोठ्या जीवितहानीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर रशियाने 8 सप्टेंबरपासून अफगाणिस्तानमधून सैन्य माघारीला सुरुवात केली. 


2006- मालेगावात बॉंम्बस्फोट, 37 जणांचा मृत्यू 


2006 महाराष्ट्रातील मालेगाव या ठिकाणी सिरियल बॉंब ब्लास्ट झाले होते. यामध्ये 37 लोकांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. नंतरच्या काळात या स्फोटामागे काही हिंदुत्ववादी संघटना असल्याचं तपासातून स्पष्ट झालं. महाराष्ट्र एटीएसकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. नंतरच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.