मुंबई : इतिहासात नोंदवलेल्या प्रत्येक तारखेप्रमाणे 23 नोव्हेंबर रोजी देखील अनेक घटनांची नोंद आहे.  या तारखेच्या बहुतांश घटना दुःखद घडल्या आहेत. प्रसिद्ध शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे आजच्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबर 1937 रोजी निधन झाले. याबरोबरच  23 नोव्हेंबर 1996 रोजी अपहरण करण्यात आलेल्या इथिओपियन विमानाचा अपघात झाला. यात विमानातील  175 प्रवासी, पायलट आणि तीन अपहरणकर्त्यांसह 125 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 23 नोव्हेंबर 1980 रोजी इटलीमध्ये भूकंप झाला. यामध्ये जवळपास 2600 लोकांचा मृत्यू झाला होता. 
 


1926 : अध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांचा जन्म
अध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा त्यांच्या चमत्कारांसाठी ओळखले जातात. त्यांच्या चमत्कारांनी अनेकवेळा त्यांना वादात देखील टाकले आहे. त्यांनी केलेली समाजसेवा अतुलनीय आहे. प्रार्थनेच्या हातांपेक्षा सेवा करणारे हात अधिक महत्वाचे आहेत, असे त्यांचे मत होते. सत्यसाई बाबा यांचा जन्म 23 नोव्हेंबर रोजी पुट्टापर्थी (आंध्र प्रदेश ) येथे झाला. असे म्हणतात की, सत्य साईबाबांच्या जन्माच्या वेळी घरात ठेवलेली वाद्ये अचानक वाजू लागल्याने एक चमत्कार घडला होता.  त्यांनी पुट्टापर्थी येथे 'प्रशांती निलयम' आश्रमाची स्थापना केली येथे लोकांवर उपचारही केले जात होते. 24 एप्रिल 2011 रोजी सायंकाळी 7:40 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. 


 1937 :  भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन 


जगदीश चंद्र बोस यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी ढाका जिल्ह्यातील फरीदपूरच्या मयसिंग गावात झाला. जगदीशचंद्र बोस यांना जीवशास्त्रात खूप रस होता, तरीही ते भौतिकशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक होते. भौतिकशास्त्रात बी.एची पदवी प्राप्त केल्यानंतर बोस वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. पण तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी डॉक्टर होण्याचा विचार सोडून दिला आणि केंब्रिजच्या क्राइस्ट कॉलेजमधून बीए केले. 1885 ला ते भारतात परतले आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून काम लागले. येथे ते 1915 पर्यंत राहिले. त्यावेळी भारतीय शिक्षकांना इंग्रजी शिक्षकांच्या तुलनेत एक तृतीयांश पगार मिळत होता. याला जगदीशचंद्र बोस यांनी विरोध केला आणि तीन वर्षे पगाराशिवाय काम करत राहिले. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना वडिलोपार्जित जमीनही विकावी लागली. परंतु, चौथ्या वर्षी जगदीशचंद्र बोस जिंकले आणि त्यांना पूर्ण पगार देण्यात आला. जगदीशचंद्र बोस यांनी मायक्रोवेव्हच्या क्षेत्रात आपले वैज्ञानिक कार्य सुरू केले. सध्या वापरात असलेली अनेक मायक्रोवेव्ह उपकरणे, जसे की वेव्ह गाईड्स, पोलरायझर्स, डायलेक्ट्रिक लेन्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनसाठी सेमीकंडक्टर डिटेक्टर, एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात बोस यांनी शोधून काढले आणि वापरले.  


1946 : हायफॉन्ग बंदर शहरावर फ्रेंच नौदलाच्या हल्ल्यात 6,000 व्हिएतनामी मारले  
 23 नोव्हेंबर 1946 रोजी हायफॉन्ग बंदर शहरावर फ्रेंच नौदलाने हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल 6,000 व्हिएतनामी मारले गेले.  


1980 : इटलीतील भूकंपात 2600 लोकांचा मृत्यू 
 इटलीच्या दक्षिण भागात  23 नोव्हेंबर 1980 रोजी मोठा भूकंप झाला. या भूकंपात तब्बल 2600 लोकांचा मृत्यू झाला होता. पुढे अनेक दिवस इटलीला या धक्क्यातून सावरता आले नव्हते.   


1983 : भारतात प्रथमच राष्ट्रकुल शिखर परिषद भरली


भारतात 23 नोव्हेंबर 1983 रोजी प्रथमच राष्ट्रकुल शिखर परिषद भरली. राजधानी दिल्लीत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रकुल परिषद ही एक अशी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ज्या मार्फत विविध सामाजिक, राजकीय व अर्थव्यवस्था असलेले देश एकत्र येऊन समान तत्वे व मुद्दांवर काम करतात. 


 1984 : अभिनेत्री अमृता खानविलकरचा जन्मदिवस


अमृता खानविलकरचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी पुण्यात झाला. तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अमृता खानविलकर ही मूळची मुंबईतील आहे. परंतु, तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कूलमध्ये झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात झाले. सध्याच्या मराठी अभिनेत्रींमध्ये अमृताचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. नुकताच प्रदर्शित झालेला तिचा चंद्रा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.    


1990 :  प्रसिद्ध ब्रिटिश लेखक रोआल्ड डहल यांचे इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे निधन  


प्रसिद्ध ब्रिटिश लेखक रोआल्ड डहल यांचे इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे 23 नोव्हेंबर 1990 रोजी निधन झाले. त्यांनी मुलांसाठी अप्रतिम साहित्य निर्माण केले. 


1996 :  इथियोपियन एअरलाइन्सच्या बोईंग 767 या विमानाचे अपहरण


आदिस अबाबा ते नैरोबी या मार्गावर इथियोपियन एअरलाइन्सच्या बोईंग 767 या विमानाचे अपहरण करण्यात आले. परंतु, कमी इंधनामुळे हे विमान हिंदी महासागरात कोसळले. या घटनेत विमानातील  175 प्रवासी, पायलट आणि तीन अपहरणकर्त्यांसह 125 जणांचा मृत्यू झाला. 


2001 : इस्रायलच्या हल्ल्यात कट्टरतावादी संघटना हमासचा प्रमुख सदस्य महमूद अबू हनुद ठार


इस्रायली हेलिकॉप्टरने वेस्ट बँकमध्ये एका वाहनावर दोन क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये इस्लामिक कट्टरतावादी संघटना हमासचा प्रमुख सदस्य महमूद अबू हनुद ठार झाला.


2011 : येमेनचे अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांचा राजीनामा 


 लोकशाही वाचवण्याच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या निदर्शनांमुळे येमेनचे अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांना 33 वर्षांच्या कार्यकाळानंतर 23 नोव्हेंबर 2011 रोजी राजीनामा द्यावा लागला.