Karnataka Hijab Row : मागील काही दिवसांपासून शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरुन सुरु असलेल्या वादावर आज कर्नाटक उच्च न्यायालयानं मोठा निर्णय सुनावला. शैक्षणिक संस्थामध्ये  हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnatak High Court) दिला. तसेच, यावेळी हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याचंही कोर्टाने सांगितलं. दरम्यान यानंतर विविध स्तरातून यावर अनेक प्रतिक्रिया येत असून माजी खासदार हुसेन दलवाई यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ''श्रीमंत मुस्लिमांच्या मुली परदेशात शिकतात तेव्हा त्या हिजाब घालतात का? असा सवाल विचारत या वादामुळे मुस्लिम मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत'', असंही दलवाई म्हणाले आहेत.


कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरनंतर आपली प्रतिक्रिया देताना दलवाई म्हणाले, ''एका शाळेत सुरु झालेला वाद सगळ्या देशभरात कोण घेऊन गेलं? जरा उचकवलं की या मुद्द्यावर राजकारण करू पाहणाऱ्यांना हवं ते मिळतं हे मुस्लिमांनी लक्षात घ्यायला हवं. या अशाप्रकारच्या वादामुळे मुस्लिम मुली शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत.'' 


हिजाबबद्दल निकालात कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी 
 
- हिजाब परिधान करणं ही इस्लामी धर्माचरणात आवश्यक क्रिया आहे की नाही याचा फैसला कोर्टाला करायचा होता
- कलम 25 नुसार धार्मिक आचरणाचं स्वातंत्र्य घटनेनं दिलेलं आहे. पण या धार्मिक स्वातंत्र्याची बाब इथे लागू होत नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे. 
- स्कूल यूनिफॉर्मबाबत केलेले नियम ही तार्किक बंधनं आहेत, घटनेनेही काही बंधनं आणण्याचा जो अधिकार दिला आहे. त्याचनुसार हे नियम बनल्याने विद्यार्थी त्याला विरोध करु शकत नाहीत
- कर्नाटक सरकारचा आदेश अवैध ठरवावा अशी कुठलीही कारणं या केसमध्ये दिसत नाहीत. 


काय आहे हिजाब वाद?


कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान करण्याच्या मुद्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींना सातत्यानं महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारनं जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार, हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आला. 


या आदेशानंतरही काही मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब परिधान करुन आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभं करण्यात आले. त्यामुळे या मुलींनी गेटबाहेर निदर्शनं केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवं उपरणं घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला. या मुद्यावरुन सध्या देशात वादंग निर्माण झाले आहे. याचे देशात पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटत आहेत.



संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha