Punjab Election 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) 92 जागा जिंकून इतिहास रचला आहे. 16 मार्च रोजी भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे नवे मुख्यमंत्री (Punjab CM) म्हणून शपथ घेणार आहेत. सरकार स्थापनेसोबत आम आदमी पार्टी आणखी एक इतिहास रचणार आहे. 


आतापर्यंत एकाही महिलेला मिळाली नाही संधी


पंजाब विधानसभेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही महिला आमदाराला सभापती होण्याची संधी मिळालेली नाही. आम आदमी पार्टीच्या आमदार सरबजीत कौर पंजाबच्या पहिल्या महिला स्पीकर होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, सभापती बनण्याच्या शर्यतीत बलजिंदर कौर यांच्या नावाचाही समावेश आहे. इंग्रजी वृत्तपत्र द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पंजाब विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती बनण्याच्या शर्यतीत सरबजीत कौर पुढे आहेत. सरबजीत कौर यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. आम आदमी पार्टीही बलजिंदर कौर यांच्या नावावरही विचार करत आहे. 


मंत्रिमंडळ स्थापन होणार


आम आदमी पक्षाच्या मंत्रिमंडळ स्थापनेची घाई नसल्याचं कळत आहे. आम आदमी पक्षाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की 16 मार्च रोजी केवळ भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पंजाब सरकारचे नवे मंत्रिमंडळ नंतर स्थापन होणार आहे. आम आदमी पार्टी आपल्या आमदारांसाठी खास योजना बनवत आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पंजाब विधानसभेच्या अध्यक्षांच्या नावावरही चर्चा केली. पहिल्यांदाच आम आदमी पक्षाच्या तिकिटावर 80 आमदारांनी विधानसभा निवडणूक जिंकली आहे. 'आप'ने पंजाब निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेससह अकाली दल आणि भाजपला धोबीपछाड दिला. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उपमुख्यमंत्री, पंजाब काँग्रेस अध्‍यक्ष नवजोत सिंह सिद्धू अशा दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्याशिवाय कॅप्टन अमरिंदर आणि सुखबीर सिंह बादल यांचाही पराभव झाला. पंजाबमधील या निवडणूक विजयाचा आम आदमी पक्षाला राज्यसभेतही मोठा फायदा होणार आहे. येत्या 31 मार्च रोजी पंजाबमधून राज्यसभेच्या खासदारांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 'आप'कडे असलेले बहुमत पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.  राज्यसभेत एकूण सात जागा पंजाबमधून निवडल्या जातात. त्यातील पाच जागांसाठी 31 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या: