मुंबई : महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनानंतर आता दिल्ली पोलिसांनी पक्षावर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आंदोलनात सहभागी सर्व कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आज आपल्या देशात निषेध करणे आणि आपले मत व्यक्त करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांना जे काही करायचे आहे ते ते करू शकतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केलीय. 


शुक्रवारी काँग्रेस पक्षाने महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली होती. सर्वात तीव्र विरोध दिल्लीत दिसून झाला. नवी दिल्लीत कलम 144 लागू झाल्यामुळे काँग्रेसच्या मोर्लाला परवानगी नव्हती. असे असतानाही काँग्रेस नेत्यांनी मात्र निदर्शने केली. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. 


आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी एफआयआर नोंदवल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, 'भाजप एफआयआर नोंदवू शकतो. त्यांना हवे ते करू शकतात. आज आपल्या देशात निषेध करणे आणि आपले मत व्यक्त करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांना जे काही करायचे आहे ते करू शकतात. काँग्रेसच्या निदर्शनांसंदर्भात दिल्ली पोलिसांनी तुघलक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  






महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी विरोधात काँग्रेसने शुक्रवारी देशव्यापी आंदोलन पुकारले होते. नवी दिल्लीच्या पोलीस उपायुक्त अमृता गुगुलोथ यांनी सांगितले की, भारतीय दंड संहिता कलम 186 (लोकसेवकाला सार्वजनिक कार्ये पार पाडण्यापासून प्रतिबंधित करणे), 188, 332    अन्वये तुघलक रोड पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला राष्ट्रीय राजधानीत निदर्शने करण्यास परवानगी नाकारली होती.  पोलिसांनी शुक्रवारी लुटियन्स दिल्ली येथून 65 खासदारांसह 300 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले होते.