नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी राजधानी दिल्लीत येऊन तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यूपीएससीमध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी महाराष्ट्रीय अधिकारी सरसावले आहेक. या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी 'पुढचे पाऊल' संस्थेच्या वतीने दिल्लीत एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


नुकत्याच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी संस्थेने उपलब्ध करुन दिली. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मावळणकर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

2016-17 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या 30 विद्यार्थ्यांचे अनुभव एकाच वेळी ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली. या कार्यक्रमाला दिल्लीतल्या यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, हंसराज अहिर, सुभाष भामरे या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनीही या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली.

'पुढचे पाऊल' संस्थेचे संस्थापक आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह आनंद पाटील आणि इतर मराठी अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.